महाड सत्याग्रह परिषद १०७
दासगाव ते महाड
दासगाव बंदराहून महाड सुमारे पाच मैल आहे. डॉ. आंबेडकर व रा. सहस्त्रबुद्धे निघून गेल्यानंतर रा. शिवतरकर व प्रधान बंधुंनी जमलेल्या सत्याग्रही मंडळीला डॉ. साहेबांनी दिलेली ताकीद ध्यानात ठेवण्यास विनंती केली व पाच जणांची एक एक रांग करून आलेल्या लोकांचे एक प्रकारचे पायदळ तयार केले. या प्रचंड पायदळाची मिरवणूक ' हरहर महादेव,” ' महाड सत्याग्रहकी जय ' वगैरे जयघोषात निघाली. मिरवणुकीत उद्बोधक वचने लिहिलेल्या पताका व बावटे वीस पंचवीस होते. बहिष्कृत हितकारिणी सभेने उभारलेल्या स्वयंसेवक दलाचे बँड वाजवीत व सत्याग्रह विषयक गाणी गात ही मिरवणूक महाड गावात आली. पोलीस सुपरिंटेंडेन्ट साहेब मिरवणुकीबरोबर घिरट्या घालीत होते. ठरविलेल्या रस्त्याने हे पायदळ सत्याग्रहाच्या छावणीजवळ येताच श्री. अनंतराव चित्रे सामोरे आले व त्यांनी तेथून दिसत असलेल्या रायगड किल्ल्याकडे बोट करून अंगीकृत कार्यास यश यावे म्हणून श्री. शिवरायाचा व जिजामातेचा जयजयकार करण्यास सांगितले. त्या जयजयकाराने चोहो दिशा दुमदुमून गेल्या, सर्व लोकात वीरश्रीचा संचार झाला व मोठ्या उत्साहाने लोकानी सत्याग्रह छावणीत प्रवेश केला
परिषदेचे अधिवेशन
दिवस पहिला २५-१२-१९२७
महाडच्या स्पृश्य लोकांनी कट केल्यामुळे परिषदेच्या कामाला कोणत्याच प्रकारची सामुग्री मिळू नये अशी गावकऱयांकडून खबरदारी घेण्यात आली होती हे मागे सांगितलेच आहे. त्यामुळे मंडपासाठी जागा मिळणे ही एक मोठीच अडचणीची बाब होऊन बसली होती. महाड शहरातल्या आजुबाजूच्या बहुतेक सर्व जमीनी गुजर ब्राह्मणांच्या असल्यामुळे परिषद भरविणारांची शेंडी ऐतीच आपल्या हातात सापडली आहे म्हणून हे लोक अगदी खुशीत गाजरे खात बसले होते. परंतु जवळपासच फत्तेखान नावाच्या एका मुसलमान गृहस्थाची जमीन होती. ती जमीन त्याने मोठ्या खुषीने परिषद भरविण्याकरिता दिली. ही बातमी गुजर ब्राह्मणांच्या कानावर गेल्याबरोबर त्यांचे हात पाय थंडगार पडले. परंतु शक्य तो उपाय करून परिषद भरवू द्यावयाची नाही असा त्यांनी चंग बांधला असल्याकारणाने रा. फत्तेखानाच्या दारी जाऊन त्यांनी धरणे घेतले व तुम्ही अस्पृश्य लोकांना परिषद भरविण्याकरिता जागा देऊ नका म्हणून त्यांचे पाय धरले.