१०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
परंतु त्यांची डाळ शिजली नाही. " दिलेले वचन मी कधीही मोडणार नाही. " असे सांगून त्यांनी या पाजी याचकांची हकालपट्टी केली. अशा- प्रकारे मिळविलेल्या जागेत सात आठ हजार लोक बसू शकतील इतका मोठ! मंडप उभारण्यात आला होता. तो लतापल्लवांनी व तोरणांनी विभूषित केलेला होता खालील उद्बोधक वचने लिहिलेल्या पताका आजुबाजूस लटकाविल्या होत्या :-
ब्राह्मण किंवा महार मी। गणी न कवणालाच कमी ॥
या सृष्टीतील दिव्यपण | तेंचि तेंचि ते मनुजपण || १ ||
तुम्ही नका करू गर्व । उंच याती मिळुनी सर्व ।
शुक्र शोणिताच्या खाणी | तुम्हा आम्हा एकचि योनी ।| 2 I
विष्णुमय जग वेष्णवाचा धर्म | भेदाभेद भ्रम अमंगळ ।। ३ ||
ईश्वर: सर्व भूतानां हृदेशेइर्जुन तिष्ठति ।। ४ I
सतीचा वोवसा जेणे पदरी घ्यावा | संकल्प सोडावा जिवित्वाचा || ५ ॥
ब्रीद बांधोनिया म्हणवी जो गाजी | तेणे मरणामाजी फिरू नये ।| ६ |
ऐसें कैसें रे सोंवळे | शिवतां होतसे ओवळे ॥ ७ ॥
हे धर्मयुद्ध आतां ऐसें | असुनी जरी न करशील |
तरि तूं स्वधर्म कीर्ती | बुडवूनियां पातकास वरशील | ८ ॥
मरशी तरि कीति मिळे जय । आल्या भोग सर्वही धरणी
ह्याकरितां ऊठ सख्या | निश्चित करि सर्वथैव युद्धरणी || ९ ॥
तु अझूनि कां न विचारिसी | काय हे चितित आहासी |
स्वधर्म तो विसरलासी | तरावें जणें || १० ||
आत फक्त म. गांधींची एक तसवीर ठेवण्यात आली होती. मंडपाच्या दारात मनुस्मृतीचा दहनविधी करण्याकरिता एक उत्तम प्रकारे शुंगारलेली वेदी तयार करण्यात आलेली होती. मनुस्मृतीचे दहन केल्याबद्दल ज्या ब्राह्मण्यग्रस्त लोकांना त्वेष आला आहे ते लोक असे सांगत सुटले आहेत की, सत्याग्रहःकरिता आला नाही, म्हणून आल्यासारखे काही तरी करावे म्हणून मनुस्मृती जाळण्याचा उपक्रम डॉ. आंबेडकर यांनी केला. हे म्हणणे किती खोटे आहे, हे मंडप उभारतानाच मनुस्मृती जाळण्याकरिता वेदीही तयार करण्यात आली होती, हे जो ध्यानात घेईल, त्यास सहज कळण्यासारखे आहे. मनुस्मृती जाळण्याचा निश्चय हा आयत्या वेळचा नसून पूर्वीच ठरलेला होता, हे खाली दिलेला परिषदेचा जो कार्यक्रम ठरलेला होता त्यावरूनही दिसून येण्यासारखे आहे :-