२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 152

डॉ. वाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे ११०

ते आपल्या भाषणात म्हणाले,

सद्गृहस्थहो ! सत्याग्रह कमिटीच्या [आमंत्रणास ] [मान ] [देऊन ] [आपण ] [आज ] [येथे ]

| आलात, याबद्दल कमिटीचा [अध्यक्ष ] [या ] [नात्याने ] [मी ] आपणा सर्वांचे स्वागत करतो.

आपल्यापैकी पुष्कळ जणांना आठवत असेल की, आपण सर्व मिळून गेल्या मार्च महिन्याच्या १९ व्या तारखेस येथील चवदार तळ्यावर गेलो होतो. आपल्याला तळ्यावर जरी महाडच्या स्पृश्य लोकांनी हरकत केली नव्हती, तरी त्यांची या कामी हरकत आहे, हे त्यांनी मागाहून मारामारी करून आपणास जाणविले. त्या मारामारीचा शेवट ज्या रितीने व्हावयाचा त्या रितीने झाला. मारामारी करणाऱ्या स्पृश्य लोकास चार चार महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली व ते लोक आज तुरुंगात आहेत. गेल्या ता. १९ मार्च रोजी जर आपल्याला अडथळा झाला नसता, तर आपला ह्या तळ्यावर पाणी भरण्याचा हक्क स्पृश्य लोकास मान्य आहे असे शाबीत झाले असते व आपणास आजचा हा उपक्रम करावा लागला नसता. परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. म्हणून आजची ही सभा बोलावणे भाग पडले आहे. महाडचे हे तळे सार्वजनिक आहे. महाड येथील स्पृश्य लोक इतके समजूतदार आहेत की, ते आपणच या तळ्याचे पाणी नेतात असे नव्हे, तर कोणत्याही धर्माच्या माणसाला त्या तळ्याचे पाणी भरण्यास त्यांनी मुभा ठेविली आहे व त्याप्रमाणे मुसलमानादी परधर्मीय लोकही या तळ्याचे पाणी नेतात. मानव योनीपेक्षा कमी मानलेल्या पशुपक्ष्यादी योनीतील जीवजंतूस या तळ्यावर पाणी पिण्यास ते हरकत करीत नाहीत. इतकेच नव्हे तर अस्पृश्यांनी बाळगिलेल्या जनावरांना देखील ते खुशाल पाणी पिऊ देतात. स्पृश्य हिंदू लोक दयेमायेचे माहेरघर आहेत. ते कधी हिंसा करीत नाहीत व कोणाचा छळ करीत नाहीत. उष्ट्या हाताने कावळा न हाकणाऱ्या कृपण व स्वार्थी लोकांचा हा वर्ग

नाही. साधूसंतांची व याचकांची झालेली बेसुमार वाढ ही त्यांच्या दातृत्वाची जागतीज्योत साक्ष आहे. परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप अशी त्यांची वागणूक आहे. इतकेच नव्हे तर, " दिधले दु:ख पराने उसने फेडू नयेचि सोसावे। '* हा त्यांचा स्वभावधर्म आहे आणि म्हणूनच गाईसारख्या निरुपद्रवी प्राण्याला जसे ते दयेने वागवितात तसे सर्पासारख्या उपद्रवी कुमी कीटकांचीही ते रक्षा करतात. अर्थात्‌ 'सर्व भूति एक आत्मा' असे त्यांचे शील आहे. असे हे स्पृश्य लोक आपल्याच धर्मातील काही माणसांना त्याच चवदार तळ्यातील पाणी घेण्यास बंदी करितात ! ! तेव्हा आपणासच ते बंदी का करितात असा प्रश्‍न कोणाच्याही मनात उद्भवल्याखेरीज राहणार नाही. या प्रश्‍नाचे उत्तर काय आहे हे सर्वानीच नीट समजून घेणे अत्यंत जरूरीचे आहे. त्याशिवाय आजच्या सभेचे महत्त्व पूर्णपणे आपल्या लक्षात येईल असे मला वाटत नाही.