२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 153

महाड सत्याग्रह परिषद १११

हिंदू लोकांचे शास्त्रपरत्वे चार, पण रूढीपरत्वे पाच वर्ण आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व अतिशूद्र. वर्णव्यवस्था हा हिंदू धर्माच्या यमनियमाचा पहिला नियम आहे. त्याच धर्माच्या यमनियमाचा दुसरा नियम असा आहे की, हे वर्ण असमान दर्जाचे आहेत. एकापेक्षा दुसरा हलका अशी त्यांची उतरती मालिका आहे. या यमनियमाप्रमाणे नुसते दर्जे ठरून गेले आहेत, इतकेच नव्हे तर कोण कोणत्या दर्जाचा आहे हे ओळखिता यावे म्हणून प्रत्येक वर्णाची मर्यादा ठरवून टाकिलेली आहे. हिंदू धर्मात बेटीबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी व भेटीबंदी या परस्परातील नुसत्या सहवासाच्या मर्यादा आहेत. असा सर्वसाधारण समज आहे. पण हा समज अपुरा आहे, कारण या पंचप्रकारच्या बंदी या सहवासाच्या मर्यादा तर आहेतच, पण त्या असमान दर्जाच्या लोकांना त्यांचा दर्जा कोणता हे दर्शविण्याकरिता घातलेल्या आहेत. अर्थात्‌ या सहवासाच्या मर्यादा म्हणजे असमानतेची चिन्हे आहेत. जसे डोक्यावर मुकुट असला म्हणजे तो राजा समजला जातो, हातात धनुष्य असले म्हणजे तो क्षत्रिय ओळखला जातो तसेच, ज्याला या पंचबंदापैकी कोणताच धरबंद नाही तो वर्ग सर्वात श्रेष्ठ मानला जातो व ज्याला या चारी बंदांनी बांधून टाकले आहे त्या वर्गाचा दर्जा सर्वात हीन मानला जातो. या पंचबंद्या कायम राखण्यासाठी जी एवढी धडपड करण्यात येते ती एवढ्याच करिता की, तसे झाल्याने धर्माने ठरवून दिलेली असमानता मोडून तिच्याएवजी समता प्रस्थापित होईल. . महाडचे स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांना चवदार तळ्याचे पाणी पिऊ देत नाहीत याचे कारण अस्पृश्यांनी स्पर्श केला असता, ते पाणी नासेल किंवा त्याची वाफ होऊन ते नाहीसे होईल अशामुळे 'नव्हे, अस्पृश्यांना ते पिवू देत नाहीत याचे कारण हेच की, शास्त्रांनी असमान ठरविलेल्या जातींना आपल्या तळ्यात पाणी भरू देऊन त्या जाती आपल्यासमान आहेत असे मान्य करण्याची त्यांची इच्छा नाही. सद्गृहस्थहो! आपण आरंभिलेल्या या झगड्याचा भावार्थ काय आहे, हे यावरुन आपणास कळेलच. सत्याग्रह कमिटीने आपणास महाडला बोलाविले आहे. ते महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिण्याकरिता बोलाविले आहे, असा आपला

समज होऊ देऊ नका. चवदार तळ्याचे पाणी प्याल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ

अशातला काही भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता जावयाचे नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे, म्हणजे,