११२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
ही सभा समतेची मुहूर्तमेढ रोविण्यासाठीच बोलाविण्यात आली आहे हे उघड आहे. या दृष्टीने या सभेचा विचार केला असता ती अपूर्व आहे, याबद्दल कोणासही शंका वाटणार नाही, अशी माझी खात्री आहे. आजच्या प्रसंगास या हिंदुस्थानच्या इतिहासात तिला तोड सापडेल असे मला मुळीच वाटत नाही. याच तोडीची पूर्वकाली भरलेली दुसरी सभा आपण शोधू लागलो तर, आपल्याला युरोप खंडातील फ्रान्स देशाच्या इतिहासात शिरावे लागेल. १३८ वर्षापूर्वी फ्रान्स देशातील सोळाव्या लुई राजाने तारीख २४ जानेवारी सन १७८९ | या दिवशी एक आज्ञापत्र काढून आपल्या राज्यातील प्रजेच्या प्रतिनिधींची अशीच एक सभा बोलाविली होती. या फ्रेंच राष्ट्रीय सभेच्या नावाने काही इतिहासकार खडे फोडतात. या सभेने फ्रान्स देशाच्या राजाराणीस सुळी दिले; वरिष्ठ वर्गास सळो का पळोसे करून त्यांची कत्तल केली व उरले त्यांना देशोधडीस लाविले. श्रीमंतांची मालमत्ता जप्त केली व १५ वर्षाहून अधिक साऱ्या युरोपखंडात यादवी माजवून ठेवली. असा त्यांचा या फ्रेंच राष्ट्रीय सभेवर आरोप: आहे. माझ्या मते हा ठपका अस्थानी आहे इतकेच नव्हे तर अशा इतिहासकारांना या फ्रेंच राष्ट्रीय सभेने जी कामगिरी केली, तिचे खरे इंगित कळले नाही असेच म्हणावे लागते. या सभेच्या कामगिरीमुळे फ्रान्स देशाचेच कल्याण झाले आहे असे नव्हे, तर साऱ्या युरोपखंडाचे कल्याण झाले आहे. आज युरोपियन राष्ट्रे सुख व समृद्धी भोगीत असतील त्याला कारण एकच वते हे की, या १७८९ साली भरलेल्या क्रांतिकारक फ्रेंच राष्ट्रीय सभेने समाजसंघटनेची जी तत्त्वे विस्कळीत व निर्माल्यवत झालेल्या तत्कालीन फ्रेंच राष्ट्रापुढे मांडली व त्यावर ती जबरीने लादली तीच तत्त्वे युरोप खंडाने मान्य केली व आचारात आणली.
या फ्रेंच राष्ट्रीय सभेचे महत्त्व व तिच्या तत्त्वांची महती कळण्याकरिता त्या काळची फ्रेंच समाजाची परिस्थिती ध्यानात घेतली पाहिजे. आपला हा हिंदू समाज वर्णाश्रम धर्मावर रचण्यात आला आहे हे आपणा सर्वास विदित आहेच. तशाच प्रकारची वर्णाश्रमव्यवस्था फ्रान्स देशामध्येही सन १७८९ साली होती. फरक इतकाच की, फ्रेंच समाज हा त्रैवर्णीकांचा होता. हिंदू समाजाप्रमाणे फ्रेंच समाजातही ब्राह्मण वर्ण होता व क्षत्रिय वर्णही होता. मात्र wa समाजामध्ये वैश्य, शूद्र व अतिशूद्र असे तीन निरनिराळे वर्ण न करिता तिघांचा मिळून एकच तृतीय वर्ण करण्यात आला होता. हा फरक अगदी गौण आहे. महत्त्वाची गोष्ट ही की, हिंदू समाज व फ्रेंच समाज या उभय समाजात , वर्णाश्रमव्यवस्था सारखीच होती. वर्णव्यवस्थेमुळे उभयतात उत्पन्न होणारी