२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 155

महाड सत्याग्रह परिषद ११३

भिन्नता एवढेच काय ते साम्यतेच्या दृष्टीने ध्यानात घेण्यासारखे आहे असे नाही, तर वर्णव्यवस्थेतील असमानताही फ्रेंच समाजात होती. फ्रान्स देशात या असमानतेचे स्वरूप निराळ्या प्रकारचे होते. तेथे परस्पर वर्णांतील असमानता आर्थिक स्वरूपाची होती पण ती तितक्याच तीव्र प्रकारची होती. एकूण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, आजच्या या आपल्या सभेत व फ्रान्समधील व्हरसाय मुक्कामी ता. ५ मे सन १७८९ रोजी भरलेल्या फ्रेंच लोकांच्या क्रांतीकारक राष्ट्रीय सभेत अत्यंत मोठे साम्य आहे. |

त्यांच्या परस्परातील परिस्थितीत साम्य दिसते इतकेच नव्हे तर त्यांच्या ध्येयातही पुष्कळसे साम्य आहे. फ्रेंच लोकांची ती सभा फ्रेंच समाजाची संघटना करण्यास्तव बोलाविण्यात आली होती. आजची ही सभा हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी बोलाविण्यात आलेली आहे. अर्थात ही संघटना कोणत्या तत्त्वावर करण्यात यावी याची चर्चा करण्यापूर्वी या फ्रेंच लोकांच्या सभेने फ्रान्स देशाची संघटना करण्याकरिता कोणते धोरण स्वीकारिले व कोणत्या तत्त्वांचा आधार घेतला याची बूज आपण सर्वांनी करून घेतली पाहिजे. या फ्रेंच सभेचा व्याप आपल्या आजच्या समेच्या व्यापापेक्षा पुष्कळच विस्तृत असा होता. फ्रेंच लोकांच्या या सभेस राजकीय, सामाजिक व धार्मिक असे त्रिविध प्रकारचे संघटन . करावयाचे होते. आपल्याला फक्त सामाजिक व धार्मिक संघटना कशी होईल याचाच विचार करणे अवश्य आहे. आपणास राजकीय संघटनांशी तूर्त कर्तव्य नसल्यामुळे धार्मिक व समाजिक संघटनेचे बाबतीत या फ्रच सभेने काय केले एवढेच काय ते आपणास पाहावयाचे आहे. या फ्रेंच सभेने सामाजिक व धार्मिक संघटनेचे बाबतीत जे धोरण ठेविले होते ते धोरण कोणत्या प्रकारचे होते हे या सभेने जे तीन महत्त्वाचे जाहीरनामे काढले त्यावरून कोणासही उघड दिसून येणार आहे. पहिला जाहीरनामा ता. १७ जून १७८९ रोजी काढण्यात आला. तो जाहीरनामा फ्रान्स देशातील वर्णाश्रम धर्मासंबंधाने होता. पूर्वी सांगितल्याप्रमाणे फ्रेंच समाज त्रैवर्णिक होता. या जाहीरनाम्याने हा त्रैवर्णिक समाज मोडून साऱया समाजाचा एकवर्ण करण्यात आला. इतकेच नव्हे तर राजकीय सभागृहात या त्रैवर्णिकांसाठी ज्या-निरनिराळ्या जागा राखण्यात आल्या होत्या त्या खालसा करण्यात आल्या. दुसरा जाहीरनामा धर्मोपदेशकासंबंधाने होता. पुरातन रूढीप्रमाणे हे धर्मोपदेशक नेमणे किंवा काढणे हे राष्ट्राच्या स्वाधीन नसून, पोपसारख्या परदेशीय धर्माधिकाऱ्याची मिरास होऊन बसली होती. ज्यास धर्मोपदेशक पोप नेमील तो धर्मोपदेशक होत असे; मग, ज्यांना