११४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हा धर्मोपदेशक धर्माचा उपदेश करणार त्यांच्या दृष्टीने तो त्या अधिकारास लायक असो किंवा नसो! या जाहीरनाम्याने धर्माधिकारी वर्गाचे स्वयंभूपण नाहीसे करण्यात आले व हा पेशा कोणी करावा, त्याला लायक कोण व नालायक कोण, त्याला वेतन द्यावयाचे किंवा न द्यावयाचे वगैरे गोष्टी ठरविण्याचा अधिकार फ्रेंच राष्ट्राला देण्यात आला. तिसरा जाहीरनामा राजकीय, आर्थिक अथवा धार्मिक व्यवस्थेसंबंधी नव्हता. तो सर्वसाधारण असून हरएक प्रकारची सामाजिक व्यवस्था, कोणत्या तत्त्वाच्या पायावर उभारली जावी, यासंबंधाचा होता. त्यादृष्टीने हा जाहीरनामा या तीनही जाहीरनाम्यात अत्यंत महत्त्वाचा असा जाहीरनामा आहे. किंबहुना त्यास या सर्व जाहीरनाम्यांचा राजा आहे, असे म्हटले तरी चालेल. हा जाहीरनामा जन्मसिद्ध मानवी हक्कांचा जाहीरनामा या नावाने सर्व जगतीतलावर सुप्रसिद्ध होऊन राहिला आहे. तो जाहीरनामा नुसत्या फ्रान्स देशाच्या इतिहासातील एक अपूर्व अशी चीज आहे इतकेच नव्हे तर साऱ्या सुधारलेल्या राष्ट्रांच्या इतिहासात तो अपूर्व होऊन राहिला आहे. कारण याः सभेचे अनुकरण करून युरोपातील दरेक राष्ट्राने आपल्या राज्यव्यवस्थेत त्याला अधिष्ठान दिले आहे. यास्तव त्याने नुसत्या फ्रान्स देशातच क्रान्ती केली नाही, तर सर्व जगात क्रान्ती केली, असे म्हणण्यास मुळीच हरकत नाही. या जाहीरनाम्याची एकंदर १७ कलमे आहेत. त्यापैकी खालील कलमे महत्त्वाची आहेत.-
(१) सर्व माणसे जन्मतः समान दर्जाची आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील. लोकहिताकारणेच त्यांच्या दर्जात अंतर करता येईल. एरवी, त्यांचा समान दर्जा तसाच कायम राहिला पाहिजे
(२) वरील जन्मसिद्ध मानवी हकक कायम राहावेत हाच राजकारणाचा अंतीम हेतू असला पाहिजे
(३) अखिल प्रजा ही सर्वाधिकाराची मायभूमी आहे. कोणत्याही व्यक्तीचे, समुदायाचे अगर वर्गाचे विशिष्ट हक्क जर ते प्रजेने दिले नसतील तर ते इतर कशाच्याही आधारावर मग तो आधार राजकारणाचा असो, धर्मकारणाचा असो-मान्य केले जाणार नाहीत.
(४) कोणत्याही व्यक्तीला आपल्या जन्मसिद्ध हक्काप्रमाणे वागण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यावर जर मर्यादा घालण्यात आली तर ती दुसऱ्या व्यक्तीला तिचा जन्मसिद्ध हक्क उपभोगण्यास अवसर मिळावा, इतक्यापुरतीच घालता येईल व ती मर्यादा कायद्याने ठरविली जाईल. ती धर्मशास्त्राच्या आधाराने किवा इतर कशाच्याही आधाराने ठरविली जाणार नाही.