महाड सत्याग्रह परिषद ११५
(५) जेवढ्या गोष्टी समाजासं विघातक होतील तेवढ्याच गोष्टी करण्याची कायद्याने बंदी केली जाईल. जी गोष्ट कायद्याने मना केली नसेल ती करण्यास सर्वांना मुभा असावी. तसेच जी गोष्ट करणे कायद्याने अवश्य ठरविली नसेल ती गोष्ट करावयास कोणासही भाग पाडले जाऊ नये.
(६) कायदा म्हणजे अमूक एका वर्गाने ठरविलेली बंधने नव्हे. तो कोणत्या प्रकारचा असावा, हे ठरविण्याचा हक्क सर्व प्रजेस अगर तिच्या प्रतिनिधीस आहे. हा कायदा संरक्षक असो अगर शासनात्मक असो, तो सर्वांस सारखाच असला पाहिजे आणि सर्वांची समानता या तत्त्वाच्या आधारावरच सर्व प्रकारची व्यवस्था उभारणे न्याय्य असल्यामुळे सर्व व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या मानसन्मानास, अधिकारास, व्यवसायास सारखीच पात्र आहेत. या बाबतीत जर काही भेदाभेद झाला तर तो केवळ व्यक्तीतल्या गुणभेदामुळेच होऊ शकेल. जन्मामुळे होऊ शकणार नाही.
आजच्या या आपल्या सभेने या फेंच राष्ट्रीय सभेची प्रतिमा आपल्या डोळ्यांपुढे ठेविली पाहिजे असे मला वाटते व तिने जो मार्ग फ्रेंच राष्ट्राच्या संवर्धनासाठी आखून ठेवला व जो मार्ग सर्व सुधारलेल्या राष्ट्रांनी मान्य केला, तोच मार्ग हिंदू समाजाच्या संवर्धनासाठी या सभेने आखला पाहिजे व बेटीबंदीपासून भेटीबंदीपर्यन्त वर्णाश्रमाच्या चौकटीचे हे खिळे उडवून हिंदू समाजाचा एक वर्ण केला पाहिजे. त्याशिवाय अस्पृश्यता जाणार नाही व समताही प्रस्थापित होणार नाही.
आता आपणापैकी काही जणाना असे वाटेल की, आपण अस्पृश्य आहोत तेव्हा आपली लोटीबंदी व भेटीबंदी गेली म्हणजे पुरे. वर्णव्यवस्थेशी आपणास कर्तव्य नाही; ती आहे तशी राहिली तर हरकत काय आहे? पण तो समज माझ्या मते अगदी चुकीचा आहे. वर्णाश्रम कायम राखला व नुसती अस्पृश्यता घालविण्याचे धोरण ठेवले तर आपले ध्येय अगदीच हलके आहे असे लोक म्हणतील. मनुष्यमात्राच्या उद्धारासाठी जशी बाह्य प्रयत्नांची जरूरी असते तशी वासनेचीही जरूरी असते. किंबहुना वासनेशिवाय माणसाच्या हातून प्रयत्न होईल किंवा नाही, याची शंका आहे. यास्तव मोठा प्रयत्न करावयाचा असला तर तेवढी मोठी वासनाही ठेविली पाहिजे. वासना धरताना आपणास ती तृप्त करता येईल किंवा नाही याची लाज किंवा भय बाळगण्याचे काही कारण नाही. लाज असावयाची ती फक्त लहान वासना धरल्याची. मोठी वासना धरल्यामुळे अपयश पदरी आले याची लाज वाटावयास नको. अस्पृश्यता गेल्याने आज जे आपण अतिशूद्र आहोत ते शूद्र होऊ पण अतिशूद्राचे [शूद्र ] [होणे ]