२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 158

११६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

यात अस्पृश्यता समूळ गेली असे म्हणता येईल काय? अस्पृश्यता निवारण्यासाठी भेटीबंदी, लोटीबंदी मोडण्यासारखी लहान वासना ठेवून जर आपले कार्य भागते म्हणजे अस्पृश्यता जाती. तर वर्णव्यवस्था मोडा असा आग्रह धरण्यास मी आपणास सुचविले नसते. सद्गृहस्थहो! आपल्यास ठाऊक आहे की, सापाला मारावयाचे . झाले तर त्याच्या शेपटीवर मारून चालत नाही. त्याचे तोंड ठेचावे लागते. कोणत्याही उपसर्गकारी कारणाचा नाश करावयाचा झाला तर त्याचे मूळ कशात आहे, हे शोधून काढून त्या मुळावर घाव घातला पाहिजे.

कोणाचे मरण कशात आहे हे ओळखूनच त्यावर मारा करावयाचा असतो. भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर गदा घातली म्हणून दुर्योधन मेला. ती त्याच्या डोक्यावर घातली असती तर तो मेला नसता. कारण दुर्योधनाचे मरण त्याचे मांडीत होते, डोक्यात नव्हते. शारीरिक रोगाचे मरण कशात आहे याची पूर्ण जाणीव न झाल्यामुळे, रोगपरिहार करण्याकरिता वैदूने केलेले प्रयत्न कसे निष्फळ ठरतात याची जशी अनेक उदाहरणे सापडतात, तशीच सामाजिक रोगाचे निदान कशात आहे याची पूर्ण जाणीव न झाल्यामुळे तो परिहार करण्याकरिता केलेले प्रयत्न निष्फळ झाल्याची उदाहरणे इतिहासात नमूद नाहीत व त्यामुळे ती आपणास वाचावयास सापडत नाहीत. तथापि, तशा प्रकारचे जे एक उदाहरण माझ्या वाचनात आले आहे, त्याचा मी आपणास परिचय करून देत ame. युरोपातील एका प्राचीन रोमन नावाच्या राष्ट्रात प्याट्रिशीयन व प्लेबियन असे दोन वर्ग होते. पैकी प्याद्रिशीयन हे उच्च वर्णाचे व प्लेबियन हे कनिष्ठ वर्णाचे मानले जात असत. प्याद्रिशीयन लोकांच्या हातात सर्व सत्ता होती व ते या सत्तेच्या जोरावर प्लेबियन लोकास अतिशय वाईट रितिने वागवीत असत. या त्रासातून मुक्त व्हावे म्हणून त्यांनी ऐक्याच्या जोरावर असा आग्रह धरला की, मन मानेल तो कायदा अशी बेबंदशाही न ठेवता सर्वाच्या माहितीकरिता व न्यायाच्या सोईकरीता कायदे लिहून ठेवण्यात यावेत. त्यांचे प्रतिपक्षी जे प्याट्रिशीयन लोक यांनी ते मान्य केले व त्याप्रमाणे बारा कायद्याचा एक लेखी तक्ता तयार करण्यात आला, पण तेवढ्याने त्या गांजलेल्या प्लेबियन लोकांचा त्रास वाचला नाही. कारण कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी सारे प्याद्रिशीयन वर्गाचे होते; इतकेच नव्हे तर रोमन राष्ट्राचा मुख्य अधिकारी ज्याला ट्रायब्यून असे म्हणत तो प्याट्रिशीयन वर्गाचाच असे. तेणे करून कायदे जरी सारखेच असले तरी त्यांची अंमलबजावणी करताना पक्षपात झाल्याशिवाय राहत नसे. तेव्हा शेवटचा उपाय म्हणून त्यांनी प्याट्रिशीयन लोकांजवळ अशी मागणी केली की रोमन राष्ट्राचा कारभार एका ट्रायब्यूनच्या हाती राहण्यापेक्षा तो दोघा ट्रायब्यूनाच्या हाती असावा व त्यापैकी एक प्याट्रिशीयन लोकांनी निवडून द्यावा