११८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
` घालवावयाची असल्यास बेटीबंदी उठविली पाहिजे. त्याशिवाय दुसरा इलाज नाही. दुसऱ्या दृष्टीने विचार केला तरी अखेर बेटीबंदीचा उठावा करणे हाच खरा समता प्रस्थापित करण्याचा मार्ग ठरतो. कोणासही कबूल करावे लागेल की, मुख्य भेद लोपला की पोटभेद आपोआप लोपतातच. परंतु पोटभेद लोपले तर मुख्य भेद लोपेलच असे मात्र होत नाही; रोटीबंदी, लोटीबंदी व भेटीबंदी ह्या साऱ्या den एका बेटीबंदीमुळे उद्भवल्या आहेत. ती उठली की, बाकीच्यांना उठविण्याचा प्रयत्न करावयास नको, त्या आपोआप उठतातच. माझ्या मते बेटीबंदीचा बांध फोडणे ह्यातच खरे अस्पृश्यता निवारण आहे व त्यामुळेच खरी समता प्रस्थापित होणार आहे. आपणास जर अस्पृश्यता नष्ट करावयाची असेल तर अस्पृश्यतेचे मूळ बेटीबंदीत आहे हे आपण ओळखिले पाहिजे व आपला आजचा हल्ला जरी लोटीबंदीवर असला तरी त्याचा मारा अखेर बेटीबंदीपर्यन्त भिडवला पाहिजे. त्याशिवाय अस्पृश्यता ही मुळासकट उपटली जाणार नाही.
हे कार्य कोण तडीस नेऊ शकेल ? ते ब्राह्मण वर्ग पार पाडू शकणार नाही हे कोणास उघड करून सांगावयास नको. जोपर्यन्त वर्णव्यवस्था कायम आहे तोपर्यंतच ब्राह्मणवर्गाचे श्रेष्ठपण कायम आहे. कोणालाही आपले श्रेष्ठपणाचे अधिकार सोडणे शक्य नाही. कोणीही आपखुषीने आपल्या हातात असलेली सत्ता सोडून देत नाही. ब्राह्मणवर्ाने इतर वर्गावर अनेक शतकांपासून आपले सार्वभौमत्व गाजविले आहे. ते सोडून देऊन इतरांबरोबरीचा म्हणून वागण्यास तो वर्ग तयार होईल हे मुळीच संभवत नाही. जपानातील सामुराई वर्गाचे राष्ट्रप्रेम ब्राह्मण वर्गात नाही तेव्हा सामुराई वर्गाने आपले विशिष्ट सामाजिक हक्क सोडून देऊन राष्ट्रेक्य साधण्यासाठी समतेच्या पायावर राष्ट्राचा एकोपा करण्यासाठी जो स्वार्थत्याग केला, तितका स्वार्थत्याग करणे आमच्या ब्राह्मणवर्गाच्या हातून होईल अशी आशा करणे नको. ब्राह्मणेतर वर्गाच्यानेही ही कामगिरी होईलसे दिसत नाही. ब्राह्मणेतर म्हणजे मराठा व तत्सम जातींचा वर्ग हा अधिकारसंपन्न व अनधिकारी या दोन वर्गाच्या मधला वर्ग आहे. अधिकारसंपन्न वर्गाला थोडाबहुत स्वार्थत्याग करून औदार्य दाखविणे शक्य असते. अनधिकारी जो वर्ग असतो तो नेहमी ध्येयधारी. असतो. कारण त्याला स्वार्थासाठी का होईना समाजक्रांती घडवून आणावयाची असते व त्यामुळे स्वार्थप्रियतेपेक्षा त्याच्या अंगी तत्त्वप्रियता विशेष प्रमाणात बाणलेली असते. ब्राह्मणेतर वर्ग या दोहोंच्या मधला वर्ग असल्यामुळे एकाला शक्य असलेले औदार्य त्याला शक्य नाही व दुसऱ्यात