२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 162

१२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हे कार्य जसे स्वहिताचे आहे तसेच हे कार्य राष्ट्रहिताचेही आहे. चातुर्वर्णातर्गत अस्पृश्यता नाहिशी झाल्याशिवाय हिंदू समाजाचा तरणोपाय नाही. परस्परांच्या जीवनकलहात तरणोपाय म्हणून कोणत्याही समाजास जी साधनसामग्री अवश्यमेव लागते त्या साधनसामग्रीत समाजाची नीतिमत्ता हे एक मोठेच साधन आहे. एवढी गोष्ट कोणासही कबूल करावी लागेल की, ज्या समाजाची नीतिमत्ता अशा प्रकारची आहे की, ज्या गोष्टीमुळे समाज एकवट होत नाही त्या गोष्टी स्तुत्य धरल्या जातात व ज्यामुळे तो एकवट होऊ शकतो अशा गोष्टी निषिद्ध मानिल्या जातात. त्या समाजास जीवनकलहात हार खावी .लागणार आहे. उलटपक्षी ज्या समाजाची नीतिमत्ता अशा प्रकारची आहे की, ज्या कारणामुळे समाज एकवट होतो ती कारणे स्तुत्य धरली जातात व ज्या कारणामुळे समाज दुभंग होतो ती कारणे निद्य मानली जातात त्या समाजास जीवनकलहात यशप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तोच न्याय हिंदू समाजव्यवस्थेस लागू करणे प्राप्त आहे. चातुर्व्ण्यव्यवस्था ही लोकविग्रहकारी व्यवस्था आहे व एकवर्णी व्यवस्था लोकसंग्रहकारी व्यवस्था आहे हे उघड्या डोळ्यांनी दिसत असता जेणे विग्रह होतो अशा व्यवस्थेचा उदो उदो करणाऱ्या हिंदू समाजाला वारंवार हार खावी लागली तर त्यात नवल काय ? ही होत असलेली अनवस्था जर टाळावयाची असेल तर चातुर्वर्ण्याची चौकट मोडून तिचा एक वर्ण केलाच पाहिजे. एवढ्यानेच भागणार नाही. त्याबरोबरच चातुर्वर्णातर्गत असमानतेचेही उच्चाटन झाले पाहिजे. पुष्कळ लोक समतेच्या तत्त्वाची कुचेष्टा करतात. निसर्गदृष्ट्या कोणीही मनुष्य दुसऱ्याच्या समान'नसतो. कोणाची शरीरप्रकृती भव्य असते, कोण शरीराने अगदी बटु असतो, कोण जन्मत: बुद्धीने श्रेष्ठ असतो, दुसऱ्याची बुद्धी अगदी मंद असते. जन्मजात माणसे असमान उत्पन्न झाली असताना त्यांना समसमान माना असे समतावादी लोकांनी सांगणे हे या लोकांच्या दृष्टीने खुळेपणाचे वाटते. परंतु या कुचेष्टेखोर लोकांना समतेच्या तत्त्वाचा पूर्ण अर्थ कळला नसावा असे म्हणणे भाग पडते. अधिकारप्राप्ती ही कोणाच्याही जन्मावर अगर दौलतीवर अगर इतर कशावरही अवलंबून न ठेविता, ती ज्याच्या त्याच्या गुणावर अवलंबून ठेवणे असा जर समतेच्या तत्वाचा अर्थ आहे तर जो गुणहीन आहे, गलिच्छ आहे व दुर्वर्तती आहे अशा माणसाला जो गुणी आहे, स्वच्छ आहे,सद्वर्तनी आहे अशा माणसाने समानतेने वागवावे अशी मागणी कशी करता येईल? . असा उलट प्रश्‍न करण्यात येतो. गुणाने समान असलेल्या माणसाला समानतेने वागविण्यात यावे ही समतेची व्याख्या अधिकार देताना लागू करणे रास्त आहे. पण व्यक्तीतील अंगभूत गुणांचा विकास होऊन