१२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
राहील. १७८९ सालच्या फ्रेंच राष्ट्रीय सभेस अत्याचार केल्याबद्दल जे लोक दोष देतात, त्या लोकांना एका गोष्टीचा विसर पडतो. ती ही की, फ्रेंच राष्ट्रीय सभेला फ्रान्स देशातील राजाने कपटाने वागविले नसते, वरिष्ठ प्रजेने जर विरोध केला नसता, परकियांची मदत घेऊन तिला दडपून टाकण्याचे पाप केले नसते तर तिला क्रांतीच्या कार्यात अत्याचार करावा लागला नसता व सर्व समाजक्रांती शांततेने पार पडली असती. आमच्या प्रतिपक्षासही आमचे सांगणे आहे की, तुम्ही आम्हाला विरोध करू नका. परकीय सरकारची अगर परधर्मियांची मदत घेऊन आमच्यावर चढाई करू नका. शास्त्रांना झुगारून द्या, न्यायाला अनुसरा आणि आम्ही खात्री देतो की, हा कार्यक्रम आम्ही शांततेने पार पाडू.
डॉ. आंबेडकरांचे भाषण संपल्यानंतर सभेत खालील ठराव पास करण्यात
आले :-
हिंदुमात्राचा जन्मसिद्ध हक्कांचा जाहीरनामा
ठराव १.-सामाजिक अन्याय, धार्मिक ग्लानी, राजकीय अवनती आणि आर्थिक गुलामगिरी यांच्यामुळे राष्ट्र कसे अधोगतीस जाते याचे सांप्रतचा हिंदू समाज हे एक ठळक व अनुकंपनीय उदाहरण आहे, असे. या सभेचे ठाम मत आहे. हिंदू समाजास अशी घोर दशा प्राप्त होण्याचे मुख्य कारण असे की, बहुजन समाजाने मनुष्यमात्राचे जन्मसिद्ध हक्क कोणते याची जाणीव करून घेण्याची तत्परता दाखविली नाही आणि ते अबाधित ठेवण्याची खबरदारी घेतली नाही व स्वार्थसाधू लोकांच्या कृष्णकारस्थानांना आळा घातला नाही. आपले जन्मसिद्ध हक्क समजून घेणे, त्यांचे आपद्प्रसंगी संरक्षण करणे व परस्परामधील व्यवहारात त्यांची पायमल्ली होणार नाही, अशाविषयी काळजी घेणे हे समाजातील प्रत्येक मनुष्यमात्राचे पवित्र कर्तव्य आहे. हिंदुमात्राचे जन्मसिद्ध हकक कोणते हे सतत हिंदुजनांच्या डोळ्यांसमोर असावेत म्हणून जगन्नियंत्या सर्वसाक्षी परमेश्वराला साक्षी ठेवून आणि त्याचा आशीर्वाद मागून खालील जाहीरनामा ही सभा सर्वाच्या माहितीकरिता प्रसिद्ध करीत आहे.
(१) सर्व माणसे जन्मतः समान दर्जाचीच आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील. लोकोपयोगित्वाच्या दृष्टीनेच त्यांच्या दर्जात फरक पडू शकेल. एरव्ही त्यांचा समान दर्जा तसाच कायम राहिला पाहिजे. म्हणून राज्यकारभारात आणि सार्वजनिक व्यवहारात समानतेच्या तत्त्वाला बाध येईल अशा कोणत्याही धोरणाला व विचारांना थारा मिळू नये, असे या सभेचे मत आहे.
(२) वरील जन्मसिद्ध मानवी हक्क कायम राहावेत हाच राज्यव्यवस्थेचा व समाजव्यवस्थेचा अंतीम हेतू असला पाहिजे. याकरिता हिंदू समाजाच्या विषमतामूलक रचनेचा व तशा रचनेचा पुरस्कार करणाऱ्या प्राचीन व अर्वाचीन ग्रंथवचनांचा ही समा तीव्र निषेध करते.