२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 169

महाड सत्याग्रह परिषद १२७

मी कलेक्टर साहेबांस देऊन आलो आहे. त्याच्यापेक्षा मी स्वतःला जास्त काही बांधून दिलेले नाही. तरी तुम्हास जो काही निश्वय करणे असेल तो तुम्ही करावा. या प्रकरणात एकच गोष्ट ध्यानात ठेवावयास पाहिजे की, कोणतेही कायमचे हित साधवून घ्यावयाचे असेल तर त्रास व क्लेश हे सोसावे लागणार आहेतच. तपश्चर्येशिवाय कोणताही वर प्राप्त झाल्याची पुराणात किंवा इतिहासात साक्ष नाही. सुख हे नेहमीच दु:खाअंती प्राप्त होत असते. तेव्हा मनाई हुकूम मोडल्यामुळे तुरुंगात जाण्याचा प्रसंग आला तरी त्याला डगमगता कामा नये. मनाई हुकूम हा वहिवाटीच्या आधारावर देण्यात आला आहे. ती वहिवाट न्याय्य आहे किंवा अन्याय्य आहे हे देखील पाहावयास पाहिजे आहे. नाही तर कोर्टाचा हुकूम पाळण्याच्या श्रांतीने ज्या अन्यायाविरुद्ध आपण झगडतो आहोत तोच अन्याय मान्य करण्याची पाळी येण्याचा संभव आहे. सत्याग्रह ही खडतर तपश्चर्या आहे. मनावर काबू राखून सत्याग्रही लोकांना फार त्रास सहन करावा लागेल. आपण होऊन आपली मान दुसऱ्याचे हातात खुशीने द्यावयाची आहे. तुम्हास काठ्या घेऊन सत्याग्रहास जाता येणार नाही. अधिकाऱ्याची कोणतीही आज्ञा मोडता येणार नाही. सत्याग्रहास जाताना वाटेत सरकारी अधिकाऱ्यांनी पकडून तुरुंगात घातल्यावर कोणीही माफी मागता कामा नये. आपण जे केले ते योग्य केले असे शेवटपर्यंत सांगितले पाहिजे. एकंदरीत (१) काठ्या जवळ न बाळगणे, (२) सरकारची आज्ञा पाळणे, (३) तुरुंगात जाण्याची तयारी दाखविणे, (४) सरकारपुढे माफी न मागणे ह्या अटी तुम्ही कसोशीने पाळल्या पाहिजेत. तरच सत्याग्रहात सामील होऊन उपयोग. मी सांगतो म्हणून तुम्ही सत्याग्रहात येऊन उपयोगी नाही. आपला मार्ग न्यायाचा आहे, असे तुम्हास पटले असल्यास व अनेक हालअपेष्टा सहन करण्यास तुम्ही तयार असल्यास सत्याग्रह करा."

ठरावावर अशाप्रकारचे भाषण झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी सांगितले की, या ठरावावर आता जी अनुकूल, प्रतिकूल भाषणे होतील ती शांतचित्ताने ऐकून घेऊन, मग जे काही ठरवावयाचे ते ठरवा. यानंतर एक अनुकूल व दुसरा प्रतिकूल अशी व्यवस्था ठेवून खालील गृहस्थांनी सत्याग्रहास अनुकूल [भाषणे ] [केली ] [:- ]

(१) पद्मनाथ राजाराम हाटे. (२) पांडूरंग बाबाजी मांडलेकर. (३) धोंडीराम गायकवाड. (४) पांडूरंगजी नाथुजी राजभोज. (५) भिकाजी महादू पेन्शनर. (६) भांबू गणू शेणवलीकर. (७) सोनू देवजी खांबोलीकर. (८) हिरू बारकू शेलार. (९) गोविंदबुवा मालखेडकर. (१०) भिवबा भोवडकर. (११) गिरजा शंकर शिवदास. (१२) गणू धर्मा अंबोलीकर.