MR/Khand_18_1 - Page 17

मनोगत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र भाषणांचा खंड वाचकांच्या हातात देताना मला अतिशय आनंद होत आहे. डॉ आंबेडकरांची संपूर्ण भाषणे संकलीत करण्याचे कठीण कार्य डॉ. आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीने केले, त्याबद्दल समितीचे सदस्य सचिव व सर्व सदस्य अभिनंदनास पात्र आहेत.

डॉ. आंबेडकरांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने त्यांचे संपूर्ण लेखन आणि भाषणे प्रकाशित करण्याचे कार्य हाती घेतले. |

डॉ. आंबेडकरांचे विचार हे वस्तुनिष्ठ आहेत. वस्तुनिष्ठ विचार हे कधीही कालबाह्य ठरत नाहीत.

डॉ. आंबेडकरांनी भारतीय समाजात खऱ्या अर्थाने प्रबोधनाचा विचार मांडला. त्यांच्या विचारामुळे देशातील दलित समाजात परिवर्तन घडून आले. ज्या लोकांनी डॉ. आंबेडकरांचे क्रांतीकारी तत्त्वज्ञान स्वीकारले ते लोक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे आढळून येते.

डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत समावेश करणे आवश्यक आहे. नागपूर विद्यापीठ आणि डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे डॉ. आंबेडकरांच्या विचारांच्या संदर्भात स्वतंत्र पदव्यूत्तर विभाग आहेत. विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित असलेले शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. तरच देशाची नवी पिढी ही अंधश्रद्धा आणि कालबाह्य रूढीवर विश्वास ठेवणार नाही आणि ती बुद्धीवादी बनेल.

डॉ. आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ होते. त्यांची भाषणे वाचताना त्यांच्यातील | वैचारिक परिपक्वता पदोपदी आढळून येते. त्यांच्या विचारात विज्ञानवाद आणि मानवतावाद या दोहोंचा संगम दिसून येतो. डॉ. आंबेडकर हे या देशातील एक असामान्य विचारवंत आणि तत्त्ववेत्ते होते. त्यांच्या या समग्र भाषणांतून देशातील युवा पिढीला निश्चित प्रेरणा मिळेल. |

श्री. वसंत मून यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी समितीच्या ग्रंथ प्रकाशनाच्या कामात दिलेल्या योगदानाची आज आठवण होते.त्यांचे १ एप्रिल २००२ रोजी दुःखद निधन झाले. कालवश श्री. मून यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची ही मौलिक साहित्य सृष्टी जनतेला उपलब्ध व्हावी म्हणून समर्पित वृत्तीने कार्य केले होते.