१३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
देऊ पहात आहेत. तेव्हा ही झुंज खेळताना आपण पुरता विचार करावयारा पाहिजे. सरकारचा दुराग्रह असता तर आपण ही झुंज घेणे अवश्य झाले असते. पण कलेक्टर साहेबांच्या भाषणावरून तसे दिसत नाही. त्यांची आपणास पूर्ण सहानुभूती आहे. मग विनाकारण सरकारशी वाद का करावा? आपण जो उत्साह आज दाखविला तो फार अपूर्व आहे. त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. इतका उत्साह असल्यावर आपल्याला जयप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपण बदललेल्या परिस्थितीचा विचार करून सबूर करावे अशी माझी विनंती आहे. नंतर कलेक्टर साहेब यांना लौकर जावयाचे असल्यामुळे डॉ. आंबेडकर यांनी त्यांचे आभार मानिले व त्यांना पोहोचविले. कलेक्टर साहेबांच्या भाषणाचा काहीच परिणाम झाल्याचे दिसले नाही. कारण कलेक्टर साहेब गेल्यानंतर जेव्हा त्यांच्या भाषणावर वक्ते बोलू लागले तेव्हा सत्याग्रहाच्या विरुद्ध बोलणाऱ्या वक्त्यांचे ऐकून घेण्यास लोकांची तयारी नाही, असे दिसले. परंतु रा. कृष्णाजी दावणे व कु. शांताबाई शिदे यांच्यासारख्या सत्याग्रहास अनुकूल असणाऱ्या TRAST टाळ्या पडत होत्या. ही चर्चा संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालली होती. तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी सांगितले की, आज रात्री पुनः बसून याचा विचार करण्यात येईल, व उद्या सकाळी नक्की काय ते ठरवू. असे सांगून आताची बैठक संपली
आहे, असे जाहीर केले. |
दिवस तिसरा
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परिषदेची बैठक संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे सत्याग्रह करावा किंवा न करावा याचा निकाल करण्याकरिता पुन्हा रात्री काही निवडक मंडळीची बैठक भरविण्यात आली व त्यात पुष्कळ भवति न भवति होऊन सत्याग्रह तहकूब करून तूर्त गावातून मिरवणूक काढून तळ्याभोवतालून न्यावी ही तडजोड बहुमताने मान्य झाली व त्याप्रमाणे रात्री कलेक्टर साहेबास कळविण्यात आले. परंतु तहकुबीचा ठराव सभेपुढे कोणी मांडावा हा मोठाच प्रश्न येऊन पडला. डॉ. आंबेडकरांनी मांडला तरच त्याला पाठिंबा मिळण्याचा संभव होता. कारण सभा जर कोणाचे ऐकेल तर एकट्या डॉ. आंबेडकरांचे ऐकेल; दुसऱ्या कोणाचे ऐकणार नाही हे सर्वाना ठाऊक होते. त्याप्रमाणे डॉ. आंबेडकरांनीच ठराव मांडावा असा सर्वांचा आग्रह पडला व ती जबाबदारी डॉ. आंबेडकरांनी आपल्या अंगावर घेतली. तद्नुसार तिसऱ्या दिवशी सकाळी