२७-१२-१९२७ अस्पृश्य असूनही अस्पृश्यांच्या चळवळीत सहभागी न होणे लांछनास्पद - Page 182

१४० डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

सत्याग्रह करता येईल. असे सामर्थ्य तुमच्या समाजात असून तुम्ही त्याचा उपयोग करीत नाही. ह्याला तुमची बेफिकीरी म्हणावे की विलक्षण आळस म्हणावा तेच मला कळत नाही. तुम्हास सुख पाहिजे की माणुसकी पाहिजे ते ठरवा. माणुसकीशिवाय तुमचे वैभव व्यर्थ होय. तुमच्यासारख्या स्वतंत्र व सुखी लोकांनी अस्पृश्यांना माणुसकी परत आणून देण्याचे कामात आतुरतेने भाग घेतला पाहिजे. हे पुण्य थोडे तरी पदरात घ्या. ह्यात जर तुम्ही भाग घ्याल तर इतिहासात महारांबरोबर तुमचेही नाव अजरामर होईल. नाही तर तुमची पुढची पिढी तुम्ही नामर्द होतात म्हणून दोष देईल.

त्यानंतर श्री. एस. एन. शिवतरकर म्हणाले, अस्पृश्योद्धाराचे कामात तुम्ही भाग घेत नाही म्हणून तुम्ही भ्याड गणले जात आहा. तुम्ही आपले कर्तव्यकर्म बजावीत नाही. हे कार्य केवळ अस्पृश्यांचे नसून मानव जातीचे आहे. पण तुम्ही अस्पृश्य असूनही ह्या कामात भाग घेत नाही हे तुम्हास लांछनास्पद आहे. तुम्ही भटाळलेले होऊ नका व ह्या कार्यात सहकार्य करून मदत करा. त्यानंतर श्री. पां. ना. राजभोज म्हणाले, चांभार भटाळलेले होऊ लागले आहेत हे पाहून मला फार वाईट वाटते व मातंग समाजातील काही लोकांबद्दल त्याहूनही अधिक वाईट वाटते. चांभार लोक इतर अस्पृश्यांपेक्षा सुखी आहेत. पण त्यांना शिक्षण नाही म्हणून ते असे कर्तव्यच्युत होऊन राहिले आहेत.

आज अस्पृश्य पुढाऱ्यावर अरिष्ट कोसळले आहे. या वेळेस तुम्ही मत्सर व

द्वेषभावना सोडली पाहिजे. जातीभेद फार भयंकर आहे. तो विसरुन महार समाजाशी तुम्ही सहकार्य करा, सत्याग्रही बना, त्यात सर्वांचाच फायदा आहे. नंतर श्री. सहस्त्रबुद्धे म्हणाले, बॅरिस्टर साहेब तुमच्या कुळात जन्मले आणि आज विलायतेला जाऊन, विद्वान ब्राह्मणांपेक्षाही अधिक विद्वान होऊन आले. म्हणूनच मी ब्राह्मण असून आज त्यांचे शिष्यत्व पत्करिले आहे.- तुम्ही तसेच शिक्षण घ्या, जातीभेद मोडा व अस्पृश्योद्धाराचे कार्यात सहाय्य करा. बॅरिस्टर साहेबांबरोबर मी नेहमी जेवणखाण करीत असतो. त्यामुळे माझे काही बिघडले नाही. खाण्यापिण्याच्या भेदास तुम्ही उगीच महत्त्व देऊ नका. नंतर श्री. वनमाळी म्हणाले, तुम्ही सत्याग्रहात भाग घेतला नाही याबद्दल मला फार वाईट वाटते. आपले कर्तव्य बजावण्याची ही संधी उगीच दवडू नका. कर्तव्य बजावाल तर इतिहासात तुमचे नाव अजरामर होईल. ह्याप्रमाणे भाषणे झाल्यानंतर चहापान झाले व अध्यक्षांचे आभार मानल्यानंतर सुमारे ९ वाजता सभा बरखास्त झाली.