२७-१२-१९२७ अस्पृश्य असूनही अस्पृश्यांच्या चळवळीत सहभागी न होणे लांछनास्पद - Page 183

अस्पृश्य असूनही . . . . . न होणे लांछनास्पद १४१

डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मित्रांसह चांभारवाड्यातून आल्यानंतर रात्री १० वाजता पुन्हा सत्याग्रह परिषदेस सुरुवात झाली. धुळ्याचे खादीप्रसार मंडळाचे आद्य प्रवर्तक रा. देव यांचे व्याख्यान ठरले. होते. ते येण्यास थोड़ा अवकाश लागल्यामुळे, श्रीयुत गणपतबुवा जाधव यांचे व श्रीयुत कांबळे यांचे विनोदयुक्त असे देव व भक्त या विषयांवर पाव, पावतास कीर्तने झाली. यांचा लोकांवर फार मोठा परिणाम झाला. रा. देव व्याख्यान देऊन गेल्यानंतर परिषदेच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.. प्रथमतः श्रीयुत वामनराव पत्की व कमलाकर-टिपणीस.या दोन कायस्थ ज्ञातीतील तरुणांचे आभार मानण्याचा व त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल सत्याग्रह कमिटीतफे पारितोषिक म्हणून दोघास दोन सोन्याच्या आंगठ्या अर्पण करण्याचा ठराव मांडण्यात आला. ठरावावर श्रीयुत संभाजी गायकवाड़, गोविद रामजी आडेरकर हवालदार व श्रीयुत मोरे यांची भाषणे झाली. त्याच ठरावावर बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले,

वरील दोन तरुणांची कामगिरी त्यांच्या जातीस व कुळासं शोभण्यासारखी आहे. ब्राह्मण वर्गानी कायस्थ लोकांवर कमीपणाचा शिक्का मारुन त्यांना हीन ठरविण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला.. परंतु त्यांनी वेळोवेळी प्रसंगास तोंड देऊन ब्राह्मण जातीच्या या कृष्ण कारस्थानास आळा घातला. समतेचा लढा लढलेल्या कायस्थ ज्ञातीस समतेसाठी झगडणाऱ्या अस्पृश्य वर्गाबद्दल सहानुभूती वाटून त्या कार्याप्रित्यर्थ त्यांनी झटावे हे अगदी साहजिक आहे. त्यानंतर श्रीयुत कमलाकर टिपणीस व श्रीयुत पत्की यांनी प्र॑त्युतरादाखल भाषणे केली. मग महाड म्युनिसीपालिटीचे अध्यक्ष रा. सुरेंद्रनाथ टिपणीस हे बोलावयास उठले व हिंदुधर्म संरक्षणास अस्पृश्य लोकांची किती जरुरी आहे हे त्यांनी विषद करून सांगितले. त्यांच्या पाठी रा. शांताराम पोतनीस म्हणाले; सर्व गुजर व ब्राह्मणसमाज उलटला तरी आम्ही तुम्हास तन, मन, धनाने मदत करीत राहू. आमच्या कायस्थातील जुने लोकही तुम्हास विरुद्ध आहेत. पण आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाही. चवदार तळ्यावर जाण्यास जोपर्यंत अस्पृश्यांना परवानगी मिळणार नाही तोपर्यंत मीही त्या तळ्यावर पाणी पिणार नाही |

त्याच्या पुढील ठराव डॉ. आंबेडकर यांनी स्वतः मांडला. तो असा, “ सत्याग्रह परिषदेकरिता नेमलेले प्रचारक रा. शिवराम गोपाळ जाधव, संभाजी तुकाराम गायकवाड, भाऊ बाळू वारंगकर, पंढरीनाथ रामचंद्र आसूडकर, भाविकनाथ बुवा फलानकर व पांडुरंग महादेव वोउरकर यांनी आपली कामगिरी उत्तमप्रकारे बजाविल्याबद्दल ही परिषद्‌ त्यांचे आभार मानते व रा. बोउरकर, सखाराम, गोपाळ आचलोलकर, महादेव आचलोलरकंर यांनी आपणास परिषदेच्या कार्याकरिता स्वखुषीने अर्पिले हे ध्यानात घेऊन त्यांना एक एक चांदीचा बिल्ला पारितोषक म्हणून देते “.१

१ बहिष्कृत भारत : ३ फेब्रुवारी १९२८.