१९
अस्पृश्योन्नती व स्त्रियांची जबाबदारी
ता. २७ डिसेंबर १९२७ रोजी दुपारी परिषद संपवून प्रतिनिधी जेवणाच्या मंडपाकडे गेले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषदेच्या ऑफिसात, जेथे त्यांची उतरण्याची सोय केलेली होती तेथे गेले. तेथे जाऊन बसतात न बसतात तोच त्यांना पाहण्याकरिता स्त्रियांची गर्दी जमली. या स्त्रिया दूर दूरच्या गावावरून नऊ नऊ, दहा दहा मैलांच्या अंतरावरून मुद्दाम डॉ. आंबेडकरांना पाहण्यास आलेल्या होत्या. डॉ. आंबेडकरांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावयाची त्यांना इतकी उत्कट इच्छा झाली होती की, त्यापैकी पुष्कळशा स्त्रिया, आपली तान्ही मुले सोडून आल्या होत्या. संध्याकाळच्या सुमारास तर स्त्रियांची अतीच गर्दी जमली. त्यापैकी एक वृद्ध स्त्री आली. ती डॉ. आंबेडकरांना पाहून मोठमोठ्याने रडू लागली. हे पाहून जमलेल्या सर्व मंडळींची अशी खात्री झाली की, हिला कोणी तरी स्पृश्य गुंडाने मारले असावे. त्याप्रमाणे तू रडतेस का, तुला कोणी मारिले ते सांग, असे लोक विचारू लागले. तेव्हा ती म्हणाली की, मला कोणी मारिले नाही. परंतु मी इकडे येत असताना वाटेत “ तुमच्या राजाचा खय्यो झाला असे काही दुष्टांनी मला सांगितले “ असे ती म्हणाली. तेव्हा या बाईंचे रडण्याचे कारण व इतक्या स्त्रियांचे येण्याचे कारण काय हे लोकांच्या ध्यानी आले. निस्सीम प्रेमाच्या रज्जूने बद्ध झालेला स्त्रीवर्ग आपणास पाहावयास आयताच आला आहे याचा फायदा घेऊन जमलेल्या सर्व स्त्रियांस . डॉ. आंबेडकरांनी ठेवून घेतले व सांगितले की, मला तुम्हास काही समाजहिताच्या दोन गोष्टी सांगावयाच्या आहेत, त्यासाठी तुम्ही संध्याकाळी परिषदेस हजर राहावे अशी माझी तुम्हास विनंती आहे. त्याप्रमाणे सर्व स्त्रिया राहत्या झाल्या.
चांभारवाड्यातील सभा आटोपल्यानंतर बाबासाहेबांनी स्त्री वर्गाला उद्देशून भाषण केले आणि त्यानंतर जातीचे पंच, म्हेत्रे वगैरे अधिकारी लोकांना त्यांनी मार्गदर्शन केले. ठरल्याप्रमाणे शेवटच्या व महत्त्वाच्या कार्यक्रमास अध्यक्षांनी सुरुवात केली. हा शेवटचा कार्यक्रम इतका महत्त्वाचा होता की, परिषदेच्या सगळ्या कार्यक्रमात त्यालाच अग्रस्थान देणे प्राप्त आहे. शिवाय तो कार्यक्रम
बहिष्कृत भारत : ३ फेब्रुवारी १९२८.