२७-१२-१९२७ स्पृश्योन्नती व स्त्रियांची जबाबदारी - Page 186

१४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आमच्या हातून घडले आहे. व त्याच पातकामुळे आम्हास ही अस्पृश्यतेची शिक्षा भोगावी लागत आहे. तेव्हा तुम्ही विचार करावयास पाहिजे की, तुमच्या पोटी जन्म घेणे हे पाप का ठरले जावे व इतर स्त्रियांच्या पोटी जन्म घेणे पुण्यप्रद का व्हावे. या प्रश्‍नाचा जर तुम्ही विचार केला, तर तुम्हास एक तर प्रजा उत्पत्ती करणे बंद करावे लागेल किंवा तुमच्यामुळे त्यांना लागत असलेला कलंक तरी तुम्हास धुवून टाकावा लागेल. या दोहोपैकी कोणती तरी एक गोष्ट तुम्ही करावयास लागले पाहिजे. तुम्ही प्रतिज्ञा करा की, अशा कलंकित स्थितीत आम्ही यापुढे जगणार नाही. समाजोन्नती करण्याचा जसा पुरुषांनी निश्चय केला आहे तसा तुम्हीही करा. दुसरी गोष्ट आपणास जी सांगावयाची आहे ती ही की, तुम्ही सर्वांनी जुन्या व गलिच्छ चालीरिती सोडून दिल्या पाहिजेत, खरे म्हटले असता अस्पृश्य माणसास तो अस्पृश्य आहे अशी ओळख पटविणारा शिक्का त्याच्या कपाळावर मारलेला नाही. परंतु अस्पृश्य लोकांच्या ज्या काही चालीरिती आहेत त्या चालीरितींवरुन लोक अमूक एक माणूस अस्पृश्य जातीपैकी आहे असे चटकन ओळखतात. ह्या चालीरिती एकेकाळी आपल्यावर . सक्तीने लादण्यात आल्या होत्या असे माझे मत आहे. परंतु इंग्रज सरकारच्या ` राज्यांत तशा प्रकारची सक्ती होऊ शकत नाही. म्हणून ज्या गोष्टीमुळे लोक आपण अस्पृश्य आहोत असे ओळखतात त्या साऱ्या गोष्टी आता तुम्ही बंद केल्या पाहिजेत. तुमची लुगडी नेसण्याची पद्धत ही तुमच्या अस्पृश्यतेची साक्ष आहे. ती साक्ष तुम्ही बुजवली पाहिजे. वरिष्ठ वर्गाच्या बाया ज्या पद्धतीने लुगड़ी नेसतात त्या पद्धतीने तुम्ही लुगडी नेसण्याचा प्रघात पाडला पाहिजे. तसे करण्यात तुमचे काही खर्चत नाही. त्याचप्रमाणे गळ्यामध्ये भाराभर गळसऱ्या व हातात कोपरभर कथलाचे किंवा चांदीचे गोठ-पाटल्या ही देखील तुम्हास ओळखण्याची खूण आहे. एका गळसरीपेक्षा अधिकांची जरूरी नाही. त्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते किंवा आपल्या शरीराला शोभा येते अशातला काही भाग नाही. दागिन्यापेक्षा कपड्यालाच जास्त शोभा आहे. तेव्हा कथलाच्या किंवा चांदीच्या दागिन्यात पैसे खर्च करण्याऐवजी चांगल्या कपड्यात पैसे खर्च करा. दागिना घालावयाचाच झाला तर तो सोन्याचा करून घालावा नाहीतर घालू नये. त्याचप्रमाणे स्वच्छतेने वागण्याची खबरदारी घ्या. तुम्ही घरच्या गृहलक्ष्मी आहात; घरात कोणतीही अमंगल गोष्ट होऊ न देणे याबद्दल तुम्ही काळजी वाहिली पाहिजे. गेल्या मार्च महिन्यापासून सर्व लोकांनी मेलेल्या जनावरांचे मांस खाणे बंद केले आहे ही गोष्ट आनंदाची आहे. परंतु एखाद्या घरी तसे झाले नसल्यास ते घडवून आणण्याची जबाबदारी तुम्ही आपल्या अंगावर