२७-१२-१९२७ स्पृश्योन्नती व स्त्रियांची जबाबदारी - Page 187

अस्पृश्योन्नती . . . . . जबाबदारी १४५

घेतली पाहिजे. जो नवरा मेलेल्या जनावरांचे मांस घरात आणील त्यास तुम्ही स्पष्ट सांगा की, असला प्रकार माझ्या घरी चालणार नाही आणि माझी खात्री आहे की, ही गोष्ट जर तुम्ही मनावर घ्याल तर हा अमंगल प्रकार अजिबात बंद होणार आहे. तसेच तुम्ही आपल्या मुलींनाही शिक्षण दिले पाहिजे. ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाहीत. त्या स्त्रियांनाही आवश्यक आहेत. ही गोष्ट आपल्या पूर्वजांनीही ओळखिली होती. नाहीतर जे जे लोक पलटणीत राहिले त्या त्या लोकांनी आपल्या मुलींना जे शिक्षण दिले ते दिले नसते. खाण तशी माती, ही गोष्ट ध्यानात ठेवून, आपली पुढील पिढी जर तुम्हास सुधारावयाची असेल तर, तुम्ही मुलींना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका. हा जो उपदेश मी तुम्हाला केला आहे तो तुम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अशी मला आशा आहे. तो अंमलात आणण्यास दिरंगाई करता कामा नये. म्हणून तुम्ही सकाळी आपल्या घरी जाण्यापूर्वी, तुमच्या नेसण्याच्या पद्धतीत बदल करून मला दाखवा आणि मग जा. तरच मी सांगितल्याचे चीज झाले असे मी समजेन.

नंतर जमलेल्या स्त्रियांतफं श्रीमती विठाबाई हीने सांगितल्याप्रमाणे आम्ही वागू असे आश्वासन दिले.

डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा सभेस जमलेल्या स्त्रीवर्गावर तात्कालिक परिणाम झाल्याचे दिसून आले. सकाळी आपापल्या गावी परत जाण्यापूर्वी नखशिखांत, आपल्या पेहरावात बदल केल्याचे दिसून आले. या त्यांच्या निश्चयाबद्दल दरेकीस चोळीबांगडीकरिता आठ-आठ आण्याचे पैसे देण्यात आले. त्याचप्रमाणे पुरुषवर्गावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यांनीही हाताकानातील रानटीपणा दर्शविणाऱ्या दागदागिन्यांना फटक्यासरशी रजा दिली. इतकेच नव्हे तर, महाड म्युनिसीपालिटीच्या कचरापट्टीत झाडूवाल्याची नोकरी [करणाऱ्या ] महारांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला.