२०
बदललेल्या परिस्थितीची जाणीव ठेवा
ता. २७ डिसेंबर १९२७ रोजी महाड सत्याग्रह परिषदेत स्त्रियांना त्यांची जबाबदारी दाखवून दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीचे पंच, म्हेत्रे वगैरे अधिकारी लोकांना एकत्रित करून सांगितले की,
आपल्याला मी आता जे काही बोलणार आहे त्याबद्दल राग येऊ देऊ नका. मी पंचाचे लेकरू आहे. माझे चुकत असल्यासं माफी करावी. आपल्या वडिलांनी पंचाची व्यवस्था केली ती फार चांगली गोष्ट केली असे माझे मत आहे. हरेक समाजाच्या चाली रुढी ठरून गेलेल्या असतात. त्या चालीरुढीप्रमाणे सर्वांनी वागावयाचे असते. एखादा कोणी जातीच्या रिवाजाप्रमाणे वागला नाही तर, त्यास ताळ्यावर आणण्यासाठी बहिष्कारासारखी किंवा दंडासारखी शिक्षा जात करते. ही शिक्षा करण्याचा अधिकार जातीने तुम्हा म्हेत्रे लोकास दिला आहे. यावरून तुमची आपल्या समाजात केवढी मोठी योग्यता आहे हे तुम्हास दिसून येईल. तुम्ही समाजातील न्यायाधिकारी व धर्माधिकारी लोक आहा. तुम्ही जसा धर्म लोकांना घालून द्याल व जसा न्याय करोल त्याप्रमाणे समाजाला बरे-. वाईट वळण लागणार आहे. परंतु तुमच्यावर सर्व लोकांचा असा आरोप आहे की, तुम्ही बेली तिकडे बोली, अशा धोरणाने वागता व खच्याचे खोटे करून, खोट्याचे खरे करता. तेणेकरून समाजामध्ये अधर्म वाढत चालला आहे व या सर्वांस तुम्ही कारणीभूत आहात. तेव्हा मला आपल्याला जे सांगावयाचे आहे ते हे की, तुम्ही आपले कर्तव्य ओळखा. काळ कोणता आला आहे हे ध्यानात घ्या व बदललेल्या परिस्थितीत आपल्याला काय केले पाहिजे याची जाणीव ठेवा. जुन्या चालीरिती टाकून देऊन, नव्या चालीरिती तुम्ही घालून द्यावयास पाहिजे आहेत. इतकेच नव्हे तर जेथे जेथे म्हणून या नव्या पद्धतीस लोक अनुकूल होणार नाहीत तेथे तेथे बहिष्काराची मात्रा लागू करून, त्यांना ताळ्यावर आणिले पाहिजे. हे जर तुम्ही करण्यास तयार असाल तर तुमची वंशपरंपरेची गादी आम्ही मान्य करू व तसे जर तुम्ही करणार नाही तर नवीन वळणाचे व नव्या धोरणाचे पंच नेमून, तुमचा अधिकार काढून घ्यावा लागेल.
बहिष्कृत भारत : ३ फेब्रुवारी १९२८.