खंड अठराच्या निमित्ताने
प्रिय वाचक,
सप्रेम जयभीम !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणांचा अठरावा खंड वाचकांच्या हातात देताना आमच्या भावना संमिश्र आहेत. डॉ. बाबासाहेबांसारख्या विसाव्या शतकातील एका सर्वश्रेष्ठ भारतीय वक्त्याची सर्व भाषणे प्रथमच वाचकांच्या हाती पडत असल्याचा अत्यानंद आणि डॉ. बाबासाहेबांच्या समग्र साहित्याच्या प्रकाशनासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देऊन समर्पित वृत्तीने काम करणारे प्रख्यात संशोधक, संपादक आयु. वसंत मून यांचे १ एप्रिल २००२ रोजी झालेले निर्वाण याचे दुःख अशा आमच्या संमिश्र भावना आहेत.
कालवश वसंत मून यांनी केलेले या साहित्य मालिकेतील खंड १ ते १६ चे साक्षेपी संपादन देशविदेशांत विद्वतमान्य आणि लोकप्रिय झालेले आहे. शेवटच्या आजारातही आयु. मून यांची या साहित्याच्या प्रकाशनासाठी सदैव धडपड चालू . असायची. महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीचे काम करताना आम्हाला आयु. वसंत मून यांचे सदैव मार्गदर्शन मिळत असे. आम्ही सदैव एकत्रच काम करीत असू. त्यांच्या आजारपणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कामात खंड पडू नये म्हणून मून सरांनी समितीचा कार्यभार आमच्याकडे सोपवला, आम्हाला तो आमचा फार मोठा गौरव वाटला.
तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते ६ सप्टेंबर २००१ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये १७ वा खंड आयु. मून यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला. परंतु त्यात काही त्रूटी राहून गेल्याने त्याची विक्री थांबवून निर्दोष खंड तयार करण्यासाठी हरी नरके, प्रा. अशोक गोडघाटे, एन. जी. कांबळे व प्रा. म. ल. कासारे यांचे संपादक मंडळ नेमण्यात आले. दरम्यान मराठीतील खंड १८ आणि १९ चे उर्वरित कामांसाठी मा. खासदार रा. सु. गवई यांनी प्रा. अशोक गोडघाटे, प्रा. म. ल. कासारे व एन. जी कांबळे यांची अतिथी संपादक म्हणून साथ मिळवून दिली. गवईसाहेबांचे मार्गदर्शन आणि आस्थेवाईक पाठपुरावा आणि अतिथी संपादक त्रयींची बेजोड मेहनत यांच्यामुळेच आज हा १८ वा खंड वाचकांच्या हाती आम्ही दर्जेदार आणि सुबक निर्मितीमूल्यांसह देऊ शकलो.