डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनात विविध प्रसंगी जी भाषणे दिलेली आहेत ती भाषणे या खंडात प्रकाशित केली आहेत. आमच्या संशोधनातून आम्हाला मिळालेली डॉ. आंबेडकरांची ३५१ भाषणे या खंड १८ मध्ये दिलेली आहेत. आमच्या माहितीनुसार त्यांच्या सर्वच भाषणांचा समावेश या खंडात करण्यात आलेला आहे. याव्यतिरिक्त डॉ. आंबेडकरांनी आणखीही भाषणे केलेली असण्याची शक्यता आहे. _ परंतु ती भाषणे आम्हाला उपलब्ध झालेली नाहीत, तसेच त्या संदर्भात लिखित पुरावाही कुठे मिळाला नाही. या खंडातील सर्व भाषणांची मिळून पृष्ठ संख्या १८०० इतकी आहे. एवढ्या पृष्ठांचा एकत्रित खंड करणे हे वाचकांना हाताळण्याच्या दृष्टीने सोयीस्कर होणार नाही, त्यामुळे या १८ व्या खंडाचे तीन भाग केले आहेत.
पहिल्या भागात १९२० ते १९३६ या कालखंडातील भाषणे आहेत. दुसऱ्या भागात १९३७ ते १९४५ या कालखंडातील भाषणे तर तिसऱ्या भागात १९४६ ते १९५६ या कालखंडातील भाषणे आहेत.
खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रखर सामाजिक प्रबोधनाची सुरुवात १९२० पासून केली. दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे २१ व २२ मार्च १९२० मध्ये आयोजित' करण्यात आली होती. या परिषदेत कोल्हापूर संस्थानचे राजे शाहू छत्रपती महाराज उपस्थित होते. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून डॉ. आंबेडकरांची निवड करण्यात आली होती. या परिषदेत २१ मार्च १९२० ला डॉ. आंबेडकरांनी भाषण दिले. सार्वजनिक जीवनातील डॉ. आंबेडकरांचे हे भाषण त्यांचे पहिले भाषण होय. या भाषणाने १८ व्या खंडाच्या पहिल्या भागाची सुरुवात झाली. पहिल्या भागात २१ मार्च १९२० ते ८ नोव्हेंबर १९३६ या कालखंडात डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या भाषणांचा समावेश करण्यात आला आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने डॉ. आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ ला दिलेले ऐतिहासिक भाषण, नागपूर येथील ८ व ९ ऑगस्ट १९३० ला अ. भा. दलित वर्गाच्या परिषदेतील भाषण, गोलमेज परिषदेतील २० नोव्हेंबर १९३० चे भाषण, १३ ऑक्टोबर १९३५ ची धर्मांतराची घोषणा आणि ३१ मे १९३६ चे मुंबई येथील धर्मातरासंबंधी मुक्ती कोण पथे ? अशी ही सर्व महत्त्वाची भाषणे पहिल्या भागात आहेत.
दुसऱ्या भागात १६ जानेवारी १९३७ ते २७ डिसेंबर १९४५ या कालखंडातील भाषणांचा समावेश आहे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या निमित्ताने तसेच निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासंबंधी बाबासाहेबांनी केलेली भाषणे, रेल्वे अस्पृश्य कामगार परिषद, नागपूर येथील अ. भा. दलितवर्ग परिषद इत्यादी प्रसंगी डॉ. आंबेडकरांनी दिलेली महत्त्वाची भाषणे या दुसऱ्या भागात आहेत.
(सोळा)