१८-१-१९२८ स्पृश्यांनी अस्पृश्यांऐवजी स्पृश्यांचे प्रबोधन करणे श्रेयस्कर - Page 190

२१
स्पृश्यांनी अस्पृश्यांऐवजी

` स्पृश्यांचे प्रबोधन करणे श्रेयस्कर

निवृत्तिनाथाच्या यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे अस्पृश्य लोकांचा बराच मोठा समुदाय जमत असतो. त्याचा फायदा घेऊन लोकजागृती करण्याच्या हेतूने तेथेच एक सभा भरविण्याच्या इराद्याने जाहिराती काढण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे यात्रेच्या दिवशी म्हणजे बुधवार ता. १८ जानेवारी १९२८ रोजी सभा भरविण्यात आली होती. सभेचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना . देण्यात आले होते, सभेस स्त्रीपुरुषांचा अफाट समुदाय हजर होता. त्यात स्त्रियांचा भरणा तर विशेषच होता. सभेत मुख्यतः त्र्यंबकेश्‍वर येथे श्री. चोखोबाचे देवालय बांधावे की नाही, हा एकच जरी महत्त्वाचा प्रश्‍न होता तरी डॉ. आंबेडकरांनी आपल्या भाषणात अस्पृश्य वर्गाच्या सर्व ' प्रश्‍नांचे सांगोपांग विवेचन केले व श्री. चोखोबाचे देवालय बांधण्याऐवजी चोखोबाने आरंभिलेल्या अस्पृश्यतानिवारणाचे कार्य शेवटास नेण्यासाठी सतत उद्योग करणे हेच श्री. चोखोबारायाचे खरे स्मारक आहे असे सांगितले व ते जर तुम्हास करणे असेल तर बहिष्कृत भारत पत्रास धोका न येईल अशासाठी आपण उभारलेल्या बहिष्कृत भारताच्या फंडासाठी सर्वानी मदत करावी असे सुचविले. त्यानंतर श्रीयुत भाऊराव गायकवाड, रा. भालेराव, पुंजाजी, नवसाजी जाधव वगैरे सद्गृहस्थांची भाषणे झाली. त्या सर्वांचा परिणाम इतका झाला की, प्रेस फंडाच्या मदतीसाठी जागच्याजागी २०३ रुपयांची मदत झाली. त्यातल्या त्यात सार्वजनिक कामाची ज्यांना कधी वासपूस नव्हती अशा गरीब बिचाऱ्या स्त्रियांनी व साधूंनीही अल्पस्वल्प देणग्या दिल्या. सभा साडेचार वाजता संपविलीच पाहिजे, कारण त्यानंतर सर्व लोक पालखीच्या मिरवणुकीस जाणार असे अगोदरच सुचविण्यात आले असल्यामुळे, सभेस मुद्दाम दोन वाजता सुरुवात करण्यात आली होती. सभा पाच वाजता संपली असती परंतु त्या सुमारास नाशिकचे दातार शास्त्री व स्वराज्य पत्राचे संपादक रा. मराठे हे आले व लोकांचेही पालखीच्या मिरवणुकीपेक्षा सभेकडेच विशेष लक्ष आहे असे दिसून आल्यामुळे सभा बंद करण्याच्याऐवजी ती चालू ठेवावी असे ठरले व नंतर दातार शास्त्री व मराठे यांची अस्पृश्यांच्या चळवळीसंबंधी सहानुभूती दर्शविणारी भाषणेही झाली.

बहिष्कृत भारत : ३ फेब्रुवारी १९२८. |