१८-१-१९२८ स्पृश्यांनी अस्पृश्यांऐवजी स्पृश्यांचे प्रबोधन करणे श्रेयस्कर - Page 191

स्पृश्यांनी अस्पृश्यांऐवजी . . . . . . करणे श्रेयस्कर १४९

भाषणे चालू असतानाच रा. थोरात, वडेकर, जळगावचे चौधरी वगैरे गृहस्थ आले व त्यांचीही भाषणे झाली. त्यात रा. थोरात यांनी स्पष्ट सांगितले की, अस्पृश्यांना तुम्ही आपल्या पायावर उभे राहा असे सांगणे हा मूर्खपणा आहे. त्यांची अस्पृश्यता घालविण्याचा प्रयत्न आम्ही स्पृश्य लोकांनी केला पाहिजे. त्यानंतर रा. भाऊराव गायकवाड यांनी भाषण करून स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांविरूध्द जे जे मुद्दे मांडले होते त्याचे खंडन केले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी समारोपादाखल असे सांगितले की,

तुम्ही जर आमच्या लोकांची सहानुभूती बाळगता, तर तुम्ही आमच्या लोकांच्या सभेत ' येऊन भाषणे करण्याऐवजी स्पृश्य लोकांची सभा भरवून . त्यांच्यात आमच्याविषयी सहानुभूती उत्पन्न करण्याचा प्रयत्न कराल तर अधिक बरे होईल. मराठे लोकांनाही त्यांनी सांगितले की, तुम्ही शहरात सभा भरविण्याऐवजी खेडेगावात भरविली पाहिजे. कारण तेथील मराठे लोकांची स्थिती जी आपण कुलाबा जिल्ह्यात पाहिली त्यावरून ती अगदी टोणऱ्यासारखी आहे. त्यांना शहाणे करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. अशाप्रकारचे भाषण झाल्यानंतर सभेचा कार्यक्रम संपविण्यात आला व सभा मोठ्या आनंदाने पार पडली. असे असताना ' स्वराज्य ' पत्राच्या संपादकांनी डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा विपरीत अर्थ करून, त्यावर जी टीका केली आहे ती वाचून सभेस हजर असलेल्या कोणाही माणसास ' स्वराज्याचा ' संपादक ह! एक नीच वृत्तीचा माणूस आहे याची खात्री झाल्याशिवाय राहणार नाही: तेव्हा त्याविषयी जास्त लिहिण्याचे कारण नाही.