२२
अस्पृश्यतेचा उगम जाती भेदातूनच
मंगळवार दिनांक २५ सप्टेंबर १९२८ रोजी रात्री ८ वाजता मुंबईतील दादर गणेशोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पुण्याचे श्री. बापूसाहेब माटे यांची व्याख्याने एकाच वेळी ठरविण्यात आली होती. परंतु श्री. माटे यांनी आपला घसा बसल्याचे निमित्त सांगून ते या व्याख्यानाला आले नाहीत. ते येणार नसल्याचे ऐकन स्पृश्यवर्गीय विशेषतः सनातनी मंडळीची निराशा झाली होती. तसेच या जाहीर सभेतील व्याख्यानाच्या वेळी डॉ. बाबासाहेबांना शह देण्याचे, सभेत दंगल किंवा पेचप्रसंग उत्पन्न करण्याचे सारे बेत जवळजवळ ढासळले होते. तरीपण या व्याख्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पृश्य वर्गीयांबद्दल काही गैर बोलले तर त्यांचा योग्य तो समाचार घेण्याचाही बेत या मंडळीनी रचला होता. ही सारी हकिकत गुरुवर्य केळुस्कर यांना कळताच ते या सभेत मुद्दाम हजर राहिले होते.
परंतु डॉ. आंबेडकर साहेबांचे भाषणच इतके मुद्देसूद व परिणामकारक झाले की, सभेत दंगल माजविण्याच्या उद्देशाने जमलेली ही सारी मंडळी शांततेने डॉ. बाबासाहेबांच्या विद्ठत्तेचे गोडवे गात आपापल्या घरी निघून गेली.
डॉ. बाबासाहेबांनी ही सभा जिंकली होती. ते आपल्या भाषणात म्हणाले,
“ अस्पृश्यता निवारणाची अस्पृश्यांनी चालविलेली चळवळ व तिच्यावर ब्राह्मणादी स्पृश्य जातीकडून घेण्यात येणाऱ्या आक्षेपांचा विचार “ या विषयावर मी आज आपल्यासमोर बोलण्याचे ठरविले आहे. विषयाचे नाव सुटसुटीत नसून लांबलचक आहे ; पण वेळ थोडा असल्यामुळे त्याची चर्चा आपल्याला कंटाळा येईपर्यंत लांबली जाऊ नये अशी माझीही इच्छा आहे.
आमच्या चळवळीवर मुख्यतः तीन आक्षेप घेण्यात येतात. पहिला आक्षेप असा की, आम्ही स्पृश्य वर्गाशी सहकार्य न करता स्वतंत्र चळवळी करतो. दुसरा आक्षेप आमचे धोरण चढाईचे असते. तिसरा आक्षेप आम्ही जातिभेद व अस्पृश्यता या दोन वेगवेगळ्या व स्वतंत्र प्रश्नांना अभिन्न लेखून त्यांची निष्कारण खिचडी करतो व ह्यामुळे अस्पृश्यता निवारणाचा दिवस दूर ढकलण्यास कारणीभूत होतो.
पैकी पहिल्या आक्षेंपाविषयी मला सांगावयाचे ते हेच की, सहकार्य न करणे याचा अर्थ स्वतंत्रपणे व स्वावलंबनाच्या तत्त्वावर चळवळ चालविणे असा जर
समता : ५ ऑक्टोबर १९२८. :