अरपृश्यतेचा उगम जाती भेदातूनच १५१
असेल तर हा आक्षेप अगदी यथार्थ आहे, पण याचा अर्थ आम्ही कोणत्याच स्पृश्य माणसाबरोबर सहकार्य करीत नाही अगर कोणाचेच सहाय्य घेऊ इच्छित नाही, असा जर होत असेल तर हा आक्षेप खरा नाही. जो ' आमचा माणूस ' आहे असे आम्हाला खात्रीपूर्वक वाटते तो जातीने ब्राह्मण असो की अब्राह्मण असो त्याच्याशी आम्ही सहकार्य करण्यास सदैव तयार असतो. ह्या संघाचा अध्यक्ष होण्याचा बहुमान मला लाभला आहे व जातिभेद मोडून अस्पृश्यतेचे हिंदू समाजातून समूळ उच्चाटन करण्यासाठी आपल्या अल्प शक्तिनुसार जो संघ झटत आहे त्या आमच्या समाज समता संघात ब्राह्मण, ब्राह्मणेतर, अस्पृश्य वगैरे कोणालाच येण्याची मनाई नसून त्यात या सर्व जातीचे लोक आहेत. आपल्या चळवळीची सूत्रे अस्पृश्यांनी आता आपल्या हाती घेतली या घटनेतही विलक्षण असे काही नाही. एखादा समाज अगर वर्ग जेव्हा अगदी खालावलेल्या स्थितीत असतो तेव्हा त्याला सहाय्यतेचा हात देऊन वर घेण्यासाठी पुढारलेल्या जातीतील. काही माणसेच आधी पुढाकार घेत असतात. आपल्या इंडीयन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात काही इंग्लिश गृहस्थांनी पुढाकार घेतला होता. इंग्लंडातील मजूर पक्ष निर्माण करण्यास उदारमतवादी लिबरल पक्षाच्या लोकांचे प्रयत्नच आधी सहाय्यभूत झाले. पण आरंभी सहाय्य करणाऱ्या पुढारलेल्या वर्गातील लोकांची सहाय्यता मागासलेल्या लोकांना काही विशिष्ट व ठराविक मर्यादेपर्यंतच मिळू शकते. ह्या मर्यादेपलीकडे मागासलेल्या लोकांबरोबर ते येऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर आधीचे हे कैवारी पुढे पुढे त्यांचे प्रतिस्पर्धी, विरोधक व शत्रू बनतात. एके काळी सहाय्यक व आश्रयदाता असलेला लिबरल पक्ष, लेबर-मजूर, पक्षाचा याचमुळे आज प्रच्छन्न शत्रू व प्रतिस्पर्धी बनल्याचे दृश्य आपण पहात आहो. पण यामुळे मजूर पक्ष कृतघ्न आहे अगर त्याने स्वतंत्र चळवळ करू नये, असे कोणीही विचारी मनुष्य म्हणणार नाही.
अस्पृश्यता. निवारण चळवळीचाही असाच इतिहास आहे. ब्राह्मणादी पांढरपेशा वर्गातील काही सुधारक व उदारमतवादी लोकांनी अस्पृश्यांना आधी सहाय्यतेचा हात दिला. कै. आगरकर, रानडे वगैरे लोक, अस्पृश्यांना शिवण्यास हरकत नाही असे म्हणत व त्यांच्या सभेला वगैरे हजर राहून त्यांना सुधारणेच्या सहानुभूतीपर दोन गोष्टीही सांगत आणि यामुळे त्यांना आपल्या जातीची निदाही सोसावी लागे पण या सुधारकांचा ज्या जातीत जन्म झाला त्याच जातीत त्यांना अनेक सुधारणा घडवून आणावयाच्या होत्या. ज्यांना मागासलेल्या लोकात गावठी मराठी भाषेत 'पाट' असे म्हणतात ते पाट अगर पुनर्विवाह ब्राह्मण स्त्रियांचे करावे अगर करू नयेत, विधवांचे केशवपन करणे शास्त्रसंमत आहे किंवा ते धर्मशास्त्राविरूद्ध आहे, पुरूषांनी केस राखावे की राखू नयेत, स्त्रियांना शिक्षण