२३-३-१९२९ आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही - Page 198

१५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

झाले. त्या भाषणाचा लोकांच्या मनावर फार परिणाम झाला व त्यापासून स्पृश्यांनाही बोध घेण्यासारखा होता व त्यांच्यावरही चांगला परिणाम झाला असे वाटते. अध्यक्षांचे भाषण संपताच स्टार्ट कंमेटीचे सर्व सभासद यांसह डॉ. आंबेडकर, सोळंकी, अय्यर आणि अध्यक्ष यांना चहा पार्टी देण्यात आली व पुढे सोबत जोडलेले ठराव पास करण्यात आले. त्यानंतर अस्पृश्यांचे उद्धारक व पुढारी मे. डॉ. आंबेडकर साहेब, अध्यक्षांच्या विनंतीवरून आणि लोकाग्रहावरून बोलावयास उभे राहिले. त्यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला व त्यानंतर त्यांच्या भाषणास सुरवात झाली. ते म्हणाले,

अध्यक्ष साहेब आणि सभ्यगृहस्थहो,

आता वेळही बराच झालेला आहे. पाऊस पडण्याच्या बेतात आहे व तशात आपल्या मातृभाषेपेक्षा माझी मातृभाषा निराळी आहे. भाषाभिन्नत्वामुले माझे विचारही आपणास समजतील किंवा नाही, याबद्दल शंका वाटते. तरी मी माझे भाषण अगदी थोडक्यात आटोपणार आहे.

आपण ठिकठिकाणी सभा भरवतो, भाषणे करतो, ठराव पास करतो. मोठमोठ्या वक्त्यांना आणून त्यांची भाषणेही करवितो ; तथापि, माझ्या मते अस्पृश्यता नष्ट

करण्याचा हा काही मार्ग नव्हे. आपल्यावर अन्याय, जुलूम, त्रास होतो या संबंधाने ठराव पास करून सरकारकडे पाठविले आणि हेही समजा की सरकारनें आपली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आपणास सार्वजनिक विहीरी, तलाव, चहाची हॉटेले आणि देवालये जरी कायद्याने मोकळी केली तरी त्याची अम्मलबजावणी करण्याचे काम आपणाला केल्याशिवाय गत्यंतर नाही व तशाप्रकारे आपण अंमलबजावणी करण्यास असमर्थ असू तर कितीही चांगले कायदे केले तरी त्यांचा उपयोग होणार नाही.

आपली अस्पृश्यता आपणच घालविली पाहिजे ! व त्यादृष्टीने आपण सबळ

व निर्भय होण्यानेच आपली अस्पृश्यता जाणार आहे. या बाबतीत आपणास बरेच

कष्ट करावे लागतील व प्रसंगोचित आपणास स्पृश्यांशी दोन हात करण्याचा प्रसंग येणार आहे व त्यासाठी आपण हिम्मत बाळगली पाहिजे. आपला समाज परावलंबी आहे व हे चुकीचे आहे असे मी म्हणत नाही. अस्पृश्य समाज स्पृश्य समाजाशी सहकार्याने वागल्याशिवाय त्याचा तरणोपाय नाही ! अशा प्रबळ समाजाशी असहकारिता पुकारून आपला कार्यभाग कसा साधणार असे पुष्कळ लोकांना वाटते. परंतु बहिष्कृत समाजातील लोकानी हे पक्के लक्षात ठेवावे की आपला स्वावलंबनाच्या अबाधित मार्गाशिवाय अन्य मार्ग निकामी व घातकी असल्यामुळे ते प्रयत्न सर्वस्वी त्याज्य होत