२३-३-१९२९ आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही - Page 199

आपले हक्क प्रस्थापित . . . . . गत्यंतर नाही १५७

अस्पृश्य समाजात कसलाहि मनुष्य असो, तो मनुष्य कितीही सर्वगुणसंपन्न असो ! कितीही विद्वान असो ! तथापि, तो एका विशिष्ट समाजात जन्मला एवढ्याच कारणास्तव त्याच्या गुणाचे चीज होत नाही. करिता आपण आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारले पाहिजे ! हे धोरण स्वीकारल्याशिवाय या धक्काबुक्कीच्या मामल्यात आपणास गत्यंतर नाही.

आपल्यावरील अन्याय दूर करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दुसरा उपाय म्हणजे सरकारी सत्ता प्राप्त करून घेणे होय ! आपल्याला चातुर्व्ण्याच्या चौकटीबाहेर असावे लागते तरी ही चातुर्वर्ण्याची चौकट मोडून आत जावयाचे असेल तर आपणास राजकीय सत्ता हवी. राजकीय सत्ता हातात असल्याशिवाय समाजात आपणास वर्चस्व प्राप्त होणार नाही. हल्ली महाराष्ट्रातील ब्राह्मणांचेच एवढे वर्चस्व का आहे ? याचे कारण दुसरे काहीही असले तरी त्यांच्या हातात राजकीय सत्ता प्रबळ आहे हे विसरुन चालणार नाही.

हल्ली महाराष्ट्रातील ब्राह्मणांचे इतके वर्चस्व का ? याबद्दल इतिहास प्रसिद्ध एक गोष्ट सांगतो. पेशवाईपूर्वी माझ्या प्रांतात राहणारा बाळाजी विश्वनाथ आणि त्याचे जातभाई चित्पावन ब्राह्मण अत्यंत निकृष्ठावस्थेत होते. परंतु त्यांच्या हातात राजकीय सत्ता आल्याबरोबर त्या समाजाने . महाराष्ट्रात प्रमुख स्थान पटकावले आहे. परंतु आज ब्राह्मण समाजाची सरकारी नोकरीतून कायमची हकालपट्टी केली तर ब्राह्मणांचे यत्किचीतही वर्चस्व राहणार नाही. इतर प्रांतात ब्राह्मणांचे कोणत्याही प्रकारचे महत्त्व नाही. गुजरातमध्ये ब्राह्मणांना पाणकी आणि स्वयंपाकी याशिवाय महत्त्व नाही. संयुक्त व पंजाब प्रांतातील ब्राह्मण हे महार, मांगाप्रमाणे ओले अन्न मागून खातात. एकंदरीत आपले हक्क प्रस्थापित करण्याबद्दलचे आपले चढाईचे धोरण व राजकीय सत्ता प्राप्त करून या दोन साधनांनीच आपली अस्पृश्यता आपणास घालवून टाकता येईल व इतर समाजाशी बरोबरीचा दर्जा आपणास प्राप्त करून घेता येईल. एवढे सांगून, आपण माझे भाषण शांतपणे ऐकिले याबद्दल आपले मी आभार मानून माझे भाषण [पुरे ] [करितो. ]

परिषदेत पास झालेले ठराव यावर मेसर्स माने, वराळे, आसोदे, इंगळे, कोंडदेव, श्रीराम खोलवडीकर, कोल्हापूरचे पोळ (ढोर) व धारवाडचे सांब्रराणी (ढोर) या ` प्रसिद्ध पुढारी लोकांची भाषणे झाली. नंतर हारतुरे होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकारात सभेचे काम संपले.