२३-३-१९२९ आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही - Page 200

१५८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

बेळगाव जिल्हा बहिष्कृत वर्गाची सामाजिक परिषद
अधिवेशन १ ले यात पास झालेले ठराव

ठराव १ला

(अ) अस्पृश्यता मानणे हा कायद्याने गुन्हा समजला जावा.

(ब) सरकारी लिस्टातून जातीची सदरे अजीबात गाळून टाकावीत.

ठराव 2 रा

(अ) जन्मावरून कोणासही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ न समजणे. वेद, शास्त्र, पुराण . व इतर धर्मग्रंथ यात जन्मावरून उच्चनीचत्वाचे प्रतिपादन केले असल्यामुळे या धर्मग्रंथांचा अधिकार न मानणे.

(ब) वर्णा श्रम धर्माने हिंदू समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे भेद पाडिले आहेत, म्हणून वर्णाश्रम धर्माच्या घातुक तत्त्वाचा ही परिषद तीव्र निषेध करिते व आपली जात किंवा समाज दर्शविणारे शब्द आपल्या नावामागे व पुढे जोडू नयेत.

(क) राष्ट्राच्या प्रगतीकरिता व समता प्रस्थापित करण्याकरिता अस्पृश्यतेची रूढी ताबडतोब नाहीशी करणे अत्यंत जरूर आहे; म्हणून समाजाच्या अगर कायद्याच्यादृष्टीने कोणतीही जात उच्च अगर नीच समजली जावू नये. तसेच प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा समान हक्क असून, तो हक्क प्रत्येकाने बजाविला पाहिजे.

ठराव ३ रा

सरकारच्या धार्मिक बाबतीतील वृत्तीमुळे असंख्य अशा बहुजन समाजास अपमान सहन करावा लागत आहे. त्यांच्या सामाजिक हक्काचा अपहार झालेला आहे आणि त्यांची प्रगती खुंटलेली आहे. म्हणून यापुढे सरकारने धार्मिक बाबतीतील तटस्थपणाचे धोरण सोडून द्यावे आणि बहुजन समाजाचे सामाजिक स्वातंत्र्य रक्षण करण्याचे प्रयत्न करावे, तसेच या बाबतीत समाजसुधारकांच्या वतीने प्रचलित कायद्यात फरक करावा.

ठराव ४ था

(अ) सरकारने सर्व दरखास्त जमीनी इतःपर ज्या समाजातील लोकांची सांपत्तिक स्थिती फारच हलाखीची असते अशा लोकांना द्याव्या आणि अशा जमीनी देताना त्या प्रथम अस्पृश्य लोकांना देण्यात याव्या. या परिषदेचे आणखी असे