१३-४-१९२९ गुलामगिरीच्या पद्धती नष्ट करुन गलिच्छ चालीरितींना मूठमाती द्या - Page 202

२५
गुलामगिरीच्या पद्धती नष्ट करुन
गलिच्छ द्या चालीरितीना मूठमाती

भारतीय बहिष्कृत समाज सेवक संघाच्या विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूण या तालुक्यातर्फ रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे दुसरे अधिवेशन चिपळूण येथे शनिवार ता. १३ एप्रिल १९२९ रोजी संध्याकाळी ४-३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. अधिवेशनासाठी उभारलेला प्रचंड मंडप लतापताकांनी शुंगारला होता. तेथली सर्व प्रकारची व्यवस्था इतकी टापटीपपणाची होती की, स्पृश्य म्हणविणारांनाही नवल वाटल्याशिवाय राहिले नाही. ह्या परिषदेकरिता मुद्दाम मुंबईहून देवराव नाईक, संपादक 'समता', श्री. एस. एन. शिवतरकर, द. वि. प्रधान, शं. शा. गुप्ते, भा. र. कद्रेकर वगैरे मंडळी डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर आली होती. कन्हाडवरून सर्व मंडळी चिपळूण येथे येत असता वाटेत अडरे गावी अस्पृश्य मंडळीकडून पानसुपारीचा लहानसा समारंभ झाला. चिपळूण येथे अध्यक्ष व मुंबईकर पाहुणेमंडळी यांची सोय सरकारी डाकबंगल्यात करण्यात आली होती. शनिवारी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी मंडपात जवळ जवळ ८,००० मंडळी जमली होती. शहरातील इतर समाजातील मंडळीही बरीच आली होती. त्यात खानसाहेब देसाई, श्री. साठे, श्री. विनायकराव बर्वे वकील, स्थानिक म्युनिसीपालिटीचे अध्यक्ष श्री. खातू, श्री. राजाध्यक्ष, श्याम कवि, ॐ स्वामी, पितापुत्र बेंडके प्रभूती प्रामुख्याने दिसत होती. अध्यक्षांची रीतसर निवडणूक होताच परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. रगजी यांचे भाषण झाल्यावर अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भाषण करावयास उभे राहताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यांच्या भाषणास सुरुवात होताच स्पृश्य व अस्पृश्य लोक मोठ्या आतुरतेने बसलेले दिसत होते. आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले,

आज जे काही मी माझ्या बांधवांना सांगणार आहे त्याची जबाबदारी माझ्या एकट्यावर नाही. मी आज जरी अध्यक्ष असलो तरी मला जे काही तुम्हाला सांगावयाचे आहे, ते माझे स्वतःचे नाही. मी दोन वर्षापूर्वी माझ्या समाज बांधवांपुढे जे म्हणणे मांडले होते त्याचा संदेश आज तुम्हास सांगत आहे. माझ्या संदेशातील उद्देश समाजाने मान्य केला असल्यामुळे त्याची जबाबदारी माझ्या एकट्याकडे नसून तुम्ही सर्वजण त्या जबाबदारीला बांधले गेला आहात. आजचा संदेश आपल्या जातीचा आहे. एकविचाराने आणि जबाबदारीने मान्य केलेला संदेश आपणही मान्य कराल अशी मला बळकट आशा वाटत आहे. हा जातीने

बहिष्कृत भारत : ३ मे १९२९.