१३-४-१९२९ गुलामगिरीच्या पद्धती नष्ट करुन गलिच्छ चालीरितींना मूठमाती द्या - Page 204

१६२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

जागृत ठेवा. आपला आर्थिक तोटा असला तरी आपण प्रथम आपल्या कर्तव्याला जागले पाहिजे. सुख किंवा लौकिक सहजगत्या मिळत नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. तीच गोष्ट मनुष्यमात्रांच्या संसाराला व व्यवहाराला लागू आहे. आम्ही आमचे योग्य कर्तव्य बजावित असता वरिष्ठ लोक आमच्यावर निष्कारण अत्याचार करतात. ही गोष्ट मी आज नाही म्हणायला तयार नाही. आपणाला मनस्वी त्रास होणार, आपला प्रसंगी छळ होणार ह्या गोष्टी मी पूर्णपणे जाणून आहे. परंतु आपण आपल्या कार्याकरिता टक्केटोणपे सहन केलेच पाहिजेत. कित्येक लोक म्हणतात की खोतीमुळे आम्हाला आमचे योग्य कर्तव्य बजावता येत नाही. ह्या लोकांना माझे स्पष्ट सांगणे आहे की, खोतीविषयीची योग्य व्यवस्था मी'लवकरच घडवून आणणार आहे. अमूक एका अडचणीचा निकाल प्रथम लागत नाही म्हणून आपण स्वस्थ बसून चालायचे नाही. आपण स्वस्थ न बसता कार्य करीत रहा. नुसती खोती पद्धत दूर करून कार्य होणार नाही. वरिष्ठ समाज गावातील गुंड जमा करून तुमच्यावर गदा आणतील याची वाट काय ? गावातील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरणे हे तुमच्या धैर्यावर अवलंबून आहे. तुमचे न्याय्य हक्क प्रस्थापित करताना वरिष्ठ समाजाच्या बुजगावण्याला तुम्ही भीक घालाल तर, तुमच्या हातून काहीच होणार नाही. तुमच्या सुधारणेसाठी मी जर कोकण प्रांतात आलो, तर मला गोळी घालून ठार मारण्याबद्दलच्या मजकुराची अनेक धमकीची पत्रे आली आहेत. ह्या धमक्यांना मी भीक घातली असती तर आज़ आपल्यासमोर मी उभाच राहिलो नसतो. परंतु तुमच्यापुढे मात्र माझा निरुपाय झाला आहे. कोकण प्रांत सर्व दुनियेत भिकारी आहे ही गोष्ट मला ठाऊक आहे. हा प्रांत बुद्धीमध्ये श्रीमंत पण सांपत्तिक स्थितीत अगदी मागासलेला. खोत, ब्राह्मण व मराठे वगैरे लोकांनाही या प्रांतात सुख लाभणे अशक्य आहे. व्यापार उद्योगधंद्याकडे आपण लक्ष दिल्यास आपण आपल्या आपत्तीतून सुटू. खोतीच्या जाचातून ज्यांना मुक्त व्हावयाचे आहे, त्यांना सिंध व इंदोरसारख्या प्रांतात जमीनी लागवडीकरिता मिळवून देण्याचा मी प्रयत्न करीन. ह्या बाबतीत आपण आफ्रिकेत वगैरे ठिकाणी व्यापारधंदा करून श्रीमंत झालेल्या मुसलमानांचे उदाहरण दृष्टीसमोर ठेवा. वाडवडिलांच्या जागा सोडणे जिवावर येते खरे, परंतु आपला सामाजिक दर्जा वाढविण्यासाठी ह्या मार्गाचा आपण अवश्य उपयोग केला पाहिजे. मेलेल्या जनावरांचे मांस खाणे, अमंगल कृत्ये करणे वगैरे प्रकाराला तुम्ही धैर्याने आळा घाला. माझ्या आजच्या संदेशातील ह्या गोष्टीचा आपण विचार करून आजच शपथपूर्वक प्रत्यक्ष कार्याला लागा. आजच्या नवयुगोत कोणीही गुलाम नाही हे लक्षात ठेवा. | a