१४-४-१९२९ स्वावलंबन व स्वाभिमानाशिवाय तरणोपाय नाही - Page 206

१६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

करून त्या आपल्या ताब्यात घ्याव्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवन चारी बाजूंनी संकटात राहिले तरी धनिकांना व खोतांना त्याची पर्वा नसते. अशा वेळी श्रमजिवी शेतकऱ्यांच्या कष्टाचे, मेहनतीचे फळ सरकारने मिळवून दिले पाहिजे. माणसाच्या जीविताचे व वित्ताचे रक्षण करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे आणि अशा बाबतीत सरकारने गरिबांची दाद घेतली नाही तर ते सरकार सुधारलेले आहे असे म्हणता येणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील एक जुलमी खोत आपल्या अधिकाराचा अतिरेक स्त्रियांच्याही अब्रुवर घाला घालून करू शकतो. शेतकरीवर्ग आज खोती पद्धतीमुळे गुलामगिरीत खिचपत पडला आहे. सत्तेचा दुरुपयोग ही न्यायनीती आहे असे कसे म्हणता येईल ! ब्रिटिश राज्यात चाललेली गुलामगिरी सरकारला नालायक ठरवित आहे. अन्यायाच्या चौकटीवर कोणत्याही समाजात स्वास्थ निर्माण होणार नाही. शांतता टिकवायाची असेल तर सरकारने न्याय दिला पाहिजे ; न्यायी सरकारने इतके दिवस खोती पद्धती चालू ठेविली ही गोष्ट अन्यायाची आहे. सरकारी रानावर खोतांनी हक्काचा अंमल गाजवावा आणि कुळांना जुलुमाखाली नाहक छळावे हे काय गौडबंगाल आहे हेच कळत नाही. सारासार विचार करता खोतीची पद्धत मुळासकट सदोष आहे. सरकार कधीही लहानसहान ओरडीला भीक घालीत नसते. तुम्ही तुमची चळवळ अत्यंत घिटाईने चालू ठेविली पाहिजे. आपल्यावरील अन्यायाची ओरड सारखी करीत राहून उलटपक्षाशी लढत राहिले. तरच चारपाच वर्षात स्वराज्याला पोषक असे हक्क मिळणार आहेत. आजतागायत चळवळी करताना सरकारची मिनतवारी करावी लागत असे. पण चारपाच वर्षांनी पूर्ण सत्ता स्थापन होणार आहे. कोौन्सिलमध्ये तुमच्या प्रांतातफें प्रतिनिधी पाठविताना योग्य काळजी घ्या. काही झाले तरी कुणाच्या भिडेस बळी न पडता आपल्या मताला पाठिंबा देणारा मनुष्य कौन्सिलात पाठविला पाहिजे. तावून सुलाखून प्रतिनिधी पाठवा, खोतांच्या व खोतांच्या जातभाईंना मते देऊन कौन्सिलात पाठवू नका. समाजाचे जीवन परस्वाधीन असल्यामुळे एकमेकावर अवलंबून राहिल्याशिवाय गत्यंतर नाही. कुणबी लोकांनी आपल्या स्वाभिमानाला जागून वरिष्ठ लोकांची हलकीसलकी कामे करून स्वतःचा सामाजिक दर्जा मुळीच कमी करून घेऊ नये. स्वावलंबन आणि स्वाभिमान बाळगून आपण आपले कार्य नेटाने करताना ऐक्य व संघटना स्थापन करा. आणि अशा एकोप्याच्या संघटनेच्या चळवळीने आपल्या गाऱ्हाण्यांची दाद कौन्सिलपर्यंत जाऊन लावून घेता येईल. असल्या नेटाच्या प्रयत्नांचा परिणाम खात्रीने यशस्वी होईल याची मला खात्री वाटते.