२९-६-१९२९ आम्ही अस्पृश्य तेवढा एक समजतो - Page 218

१७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

शेवटी लोकाग्रहास्तव आणि अध्यक्षांच्या इच्छेकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले,

आजच्यासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी आपण सर्व अस्पृश्यांनी सुसंघटीत झाले पाहिजे. मोठ्या दुःखाची गोष्ट ही की, आपल्यातील काही लोक 'महार-महारेतर' हा वाद माजवितात !! महार जरी महाडच्या चवदार तळ्याकरिता आपल्या प्रतिस्पर्ध्याशी झगडले आणि त्यांनी तो तलाव आपलासा करून घेतला तरी त्या तळ्यातील पाणी चांभारांना आणि मांगांना देखील पिता येईल । तरी आपण सर्वानी एक झाल्याखेरीज आपला निभाव लागणार नाही ! इतकेच नव्हे तर आपल्या संस्थेतर्फे ह्या इलाख्यात जी जी बोडिँगज्‌ चालू आहेत त्यात कसल्याही प्रकारचा भेदभाव नसून, वाटेल त्या जातीतील अस्पृश्य मुलास त्यात आपला समावेश करून घेता येतो, त्याप्रमाणे बहुतेक सर्व जातीतील मुले त्या बोर्डीगात आहेत.

स्वतःच्या स्वार्थासाठी काही चांभार मंडळी उगाच महाराविरुद्ध डांगोरा पिटून आपणास धन्य मानून घेत आहेत. वास्तविक आमची चळवळ ज्या धर्तीवर चाललेली आहे; तीजपासून महाराष्ट्रातील इतर चळवळीच्या प्रमुख लोकांनी धड़ा घ्यावयास पाहिजे. पुणे, सोलापूर येथील म्युनिसीपालिटीच्या निवडणुकीत ह्या दोन्ही ठिकाणी मी स्वत: खटपट करून महार उमेदवारांस आपली नावे परत घ्यावयास लाविली व ह्या दोन्हीही म्युनिसीपालिट्यांमध्ये अस्पृश्यांतफे फक्त चांभार मंडळीच निवडून जाऊ दिली. ह्यावरून हे कोणाच्याही लक्षात येईल की, आम्ही अस्पृश्य तेवढा एक समजतो, मग त्यात जाती अगर प्रांतावरून भेदाभेद पाडून घेण्याची आम्हास काही जरूर लागत नाही कारण परिस्थितीचा वरवंटा सर्वांवर थोड्याबहुत प्रमाणावर सारखाच फिरत आहे. शेवटी अध्यक्षांचे आभार मानल्यावर हारतुरे झाल्यावर सभा बरखास्त झाली.