१६-१०-१९२९ कामगारांना जात नाही म्हणून ओरडणाऱ्या स्पृश्य पुढाऱ्यांनी याचा जबाब द्यावा - Page 219

३१
कामगारांना जात नाही म्हणून ओरडणाऱ्या
स्पृश्य पुढाऱ्यांनी याचा जबाब द्यावा

बुधवार ता. १६ ऑक्टोबर १९२९ रोजी संध्याकाळी ६-३० वाजता परळ येथे मुंबईतील बहिष्कृत वर्गाची एक जंगी जाहीर सभा पुणे येथील पर्वतीच्या सत्याग्रहास पाठिंबा देण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. सबंध हॉल लोकांनी भरून गेला होता. व्यासपीठावर श्री. भुस्कुटे, देवराव नाईक, ठाकरे, प्रधान, खांडके, कवळी, कद्रेकर, आचार्य डॉ. सुरतकर वगैरे स्पृश्य मंडळी, शिवाय श्री. शिवतरकर, माळी, आडरेकर, वगैरे अस्पृश्य मंडळीही दिसत होती. श्री. शिवतरकर ह्यांनी डॉ. आंबेडकरांनी अध्यक्षस्थान स्वीकारण्याविषयी सूचना मांडली व त्यास खांडके ह्यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. आंबेडकर टाळ्यांच्या गजरात अध्यक्षस्थानी बसले.

भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी पुणे येथील सत्याग्रहाचा त्रोटक इतिहास सांगून पुणे येथील बहिष्कृतांच्या सत्याग्रहास सर्व ठिकाणच्या बहिष्कृतांनी सर्वतोपरी मदत करणे हे त्यांचे पवित्र कर्तव्य आहे असे सांगितले व जरूर पडल्यास आपण पुण्यास सत्याग्रहास जाण्याची तयारी करण्यास तयार आहात काय म्हणून जमलेल्या समुदायास सवाल टाकताच चोहोकडून ' होय ' म्हणून

उत्तर मिळाले.

स्पृश्य लोकांच्या वागणुकीचा व त्यांच्या बहिष्कृतांब्दलच्या दृष्टिकोनाचा निषेध करून, आणखी काही काळ थांबा व मतपरिवर्तनाची वाट पहा म्हणणाऱ्या लोकांची हाव किती नीच वृत्तीची असते. काँग्रेसने देखिल विवक्षित मर्यादेत म्हणजे ३१ डिसेंबरच्या आत जर डोमिनियन स्टेटस दिले नाही, तर आपला ब्रिटिश राज्यसत्तेचा संबंध अजिबात तोडून टाकू, असे जाहीर केले असताना उगाच बहिष्कृत वर्गास थापा सांगण्यात काही अर्थ आहे की काय, असा उघडपणे सवाल आहे. हजारो वर्षे थांबून देखील काही न देणाऱ्या स्पृश्यांच्या मनाचाच नीचपणा जास्त उघड होत असून ' थांबा ' म्हणणे हा त्यांचा लपंडाव असून बेगडी मुलामा आहे. तरी पण असल्या भुलभुलावणीला आता अस्पृश्य वर्ग बळी पडण्याइतका नादान राहिला नसून तो स्वाभिमानी व जागृत बनलेला आहे व त्याचेच प्रत्यंतर म्हणजे पुण्याचा सत्याग्रह होय. मुंबई येथे लवकरच मंदीर प्रवेशाच्या सत्याग्रहाची मोहीम सुरू करण्यात येणार असून ती यशस्वी करून दाखविण्यास

बहिष्कृत भारत : १५ नोव्हेंबर १९२९.