कामगारांना जात नाही . . .... पुढाऱ्यांनी यांचा जबाव द्यावा १७९
सेक्रेटरी व इतर दोन लोक मला भेटावयास आले. त्या वेळेस तेथे श्री. देवराव नाईक व श्री. द. वि. प्रधान हेही हजर होते. बरीचशी चर्चा होऊन संपास पुरेशी कारणे नसताना व भरभक्कम पैशाचे पाठबळ नसताना संप करणे मूर्खपणाचे आहे, असे गिरणी कामगार युनियनच्या लोकास मी सांगितले व जर संपास अगदी पुरेशी कारणे असतील व त्यात जर आमच्या बहिष्कृत वर्याचा काही फायदा होत असेल तर मी मोठ्या आनंदाने संपास पाठिंबा देऊन संपात सामील होईन, असे सांगितले.
नंतर मी स्वतः संपाच्या सर्व कारणांचा तपास केल्यावर माझी अशी खात्री झाली की, हा संप काही लोक स्वत:च्या अरेरावी मतावर करून टिकवू पहात आहेत. युनियनने दिलेली अभिवचने जर युनियनचे चालक पाळणार नाहीत, तर त्या युनियनच्या शब्दास कवडीकिंमत राहणार नाही, अशी परिस्थिती होती. मुंबई सरकारने नेमलेल्या संप चौकशी कोर्टापुढे साक्षी देताना ह्याच युनियनच्या अधिकाऱ्यांनी आपली संघटना विस्कळीत झाली म्हणून आपण संप केला असा धडधडीत कबुलीजबाब दिलेला आह, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
तिसरे मुख्य कारण म्हणजे अजूनपर्यंत जे जे काही संप झाले त्यात बहिष्कृतांना कोणत्याही प्रकारे न्याय मिळाला नसून त्यांना कपडे खात्यात असलेली बंदी अजूनही कायम आहे. जमल्यास कपडे खाते बहिष्कृतांस मोकळे व्हावे व मुंबईच्या लोकास कपड्याचे काम यावे म्हणून विरोध केला. कारण येथील स्पृश्य लोक त्यास काम शिकविण्यास तयार नाहीत. म्हणून FESTA १३० माणसे आणली. परंतु कपडे खात्यातील स्पृश्य लोकांनी आपण अस्पृश्य लोकांबरोबर काम करणार नाही म्हणून ठिकठिकाणी ह्या स्पृश्य वर्गीय मजुरांनी संप केले व त्यामुळे आपण आणलेल्या अस्पृश्य मजुरांना परत जावे लागले, अस्पृश्यांवर जुलूम हाच जर कामगार चळवळीचा न्याय असेल तर कामगारांना जात नाही म्हणून नेहमी ओरडणाऱ्या स्पृश्य पुढाऱ्यांनी याचा जबाब द्यावा.
त्याचप्रमाणे गिरणीतील कोणतीही मोठी जागा अस्पृश्य वर्गाच्या लोकास देण्यात येत नाही. कारण काय तर हे जात मानणारे स्पृश्य कामगार अस्पृश्य अंमलदारांच्या व मुकादमाच्या हाताखाली काम करण्यास तयार नसतात. गिरणीतील नळावरची भांडणे व स्पृश्य स्त्रियाकडून अस्पृश्य स्त्रियांचा होणारा पाणउतारा करणे या नित्याच्या बाबी आहेत, [ज्या ] चळवळीमध्ये बहिष्कृतांच्यावर जुलूम होत असून तो चालू ठेवण्याची प्रवृत्ती त्यात असेल अशा कोणत्याही चळवळीस विरोध करणे हेच आपले कर्तव्य होय.