१८-१२-१९२९ केवळ शिक्षणाने योग्यता येते असे नाही - Page 223

३२
केवळ शिक्षणाने योग्यता येते असे नाही

धारवाड जिल्ह्यातील बहिष्कृतांची पहिली परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली धारवाड येथे ता. २८ डिसेंबर १९२९ रोजी सायंकाळी किल्ल्याच्या अद्याप उभ्या असलेल्या भव्य वेशीनजीकच्या विस्तीर्ण पटांगणात मोठ्या विलक्षण उत्साहाने भरली होती. सभेला जिल्ह्यातून अस्पृश्य प्रतिनिधी महार, मांग, चांभार, भंगी, ढोर इत्यादि हजारावर आले होते. सभास्थानी अस्पृश्यांखेरीज इतर स्पृश्य नागरिकही अनेक आले होते. व्यासपीठावर म्हैसूरच्या सौ. कनकलक्ष्मी आम्मा, श्री. पुदवेडू कृष्णारायपा हे बसले होते. स्पृश्यांमध्ये डॉ. किर्लोस्कर, डॉ. कमलाप्र, वगैरे बरीच ठळक ठळक मंडळी दिसत होती. रीतीप्रमाणे स्वागतपर पद्ये झाल्यावर स्वागताध्यक्ष वाय. बी. सांबाणी यांचे लहानसेच भाषण झाले.

नंतर येथील कर्नाटक कॉलेजमधील अस्पृश्य विद्यार्थी मि. एस. एन. माने यांनी डॉ. आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे म्हणून मराठीत सूचना आणली, तीत सेक्रेटरी मि. सबाणी यांनी कानडीत अनुमोदन दिले. रा. सा. पापाण्णा जालिंहाल, बेळगाव यांनी दुजोरा दिल्यावर अध्यक्ष टाळ्यांच्या गजरात स्थानापन्न झाले. अध्यक्षांच्या भाषणाच्या आरंभी सेक्रेटरीनी परिषदेला परगावाहून आलेले संदेश वाचून दाखविले ते मि. राजभोज, पुणे, मि. स्टार्ट, नाशिक, दे. भ. गंगाधरराव देशपांडे, हुबळी (बेळगाव), ना. जाधव, सुभेदार, घाडगे, डी. सी. मिशन, पुणे वगैरे संदेश वाचल्यानंतर अध्यक्षांचे भाषण झाले. ते अर्थात मराठीतच झाले. डॉ. आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, .

झालेल्या स्तुतीला आपण स्वतः पात्र आहो की नाही हे ठरविणे आपण स्वतःला केवळ अशक्य आहे, तरी स्तुतीला पात्र ठरविणे श्रोत्यांच्याचकडे आहे. आपण विलायतेहून आलो तेव्हा मानपत्र देण्याविषयी मंडळींनी फारच. खटपट केली. पण मी कोणत्या मोहाला न जुमानता मानपत्र स्वीकारले नाही. याचे कारण माझ्या मते उघड आहे. मानपत्र घेण्याला लायकी पाहिजे. केवळ शिक्षण घेतले म्हणजे ती योग्यता आपणास येते असे मला वाटत नाही. मनुष्य विद्वान झाला की, तो समाजाला उपयुक्त होतोच असे नाही, विद्वान मनुष्य लुच्चा, लबाड, उसण्या, लटपट्या आणखी वाटेल त्या दुर्गुणांचा असतो. आजच्या

ज्ञानप्रकाश : १ जानेवारी १९३ ०.