१८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
परिस्थितीत विद्वान, शिकलेले, पुढारलेले हे अस्पृश्यांशी कसे वागतात ते पाहातच आहोत. पण हे असे चालायचेच कारण, स्पृश्यास्पृश ही घडी कालातीत आहे आणि कोणीही व्यक्ती ही घडी केव्हा निघेल हे आज छातीठोकपणे सांगू शकणार नाही. अस्पृश्यता निवारणाचे अनेक मार्ग आहेत, त्यात महत्त्वाचा म्हणजे, राजकीय सत्ता आपल्या ताब्यात घेणे हाच होय. तुमच्या सुधारणेसाठी तुमच्यात अलिकडे अनेक स्पृश्य लोक वावरू लागले आहेत. साहेब लोकही आपल्याविषयी कळकळ दाखवितात. पण हळूच म्हणतात की, राहणी सुधारा, स्वच्छ राहा, नवीन दृष्टी ठेवा. या गोष्टी योग्य आहेत, नाहीत असे नाही. पण लक्षात ठेवा की, या सर्व गोष्टी राजकीय सत्तेच्या आधीन आहेत.
राजकीय सत्ता आली की सर्व काही होईल. राजकीय सत्तेच्या अभावी जी काय होत आहे ती केवळ सुधारणा आहे, आणि राजकीय सत्ता मिळेपर्यंत ही सुधारणा काही बंद होत नाही. नुकताच आपणाला स्टार्ट कमिटीवर जाण्याचा योग आला आणि त्यामुळे ' रानटी लोक ' ज्यांना मानण्यात येते त्यांच्याशी आपला परिचय झाला. त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे, केवळ वस्त्रप्रावरण हाच बाह्यात्कारी फरक. कोणी कितीही सांगितले तरीही हे लोक आपला पेहराव कधीही सोडणार नाहीत. आज ह्या पेहरावामुळेच ते अगदी निराळेच दिसतात. या लोकांची सुधारणा काही पोशाखाने होणे नाही. सुधारणेच्या कामी पेहराव वगैरे कुचकामाचे आहे.
रानटी लोक आणि हिंदू समाज व अस्पृश्य समाज यामध्ये बराच फरक दिसतो. एकमेकातील चाली वगैरे भिन्न भिन्न आहेत. सरकारला अस्पृश्योद्धाराच्या बाबतीत कायदा करण्याचे धारिष्ट्य नाही. इतर जातींचा रोष आपणावर ओढून घेण्याला सरकार धजत नाही. राजकीय सत्तेचा काही अंश हाती आल्याखेरीज आपल्या सुधारणेला खरा जोर बसत नाही. राजकीय सत्ता हाती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे, तसा वरिष्ठ दर्जाच्याही जुलुमाला दूर करण्याला झटले पाहिजे. झटापट सर्व बाजूनेच करायची आहे. कोकणात अस्पृश्यांची स्थिती केवळ गाववाल्यांच्या मर्जीवरच अवलंबून आहे. अस्पृश्यांना गावाचे पाटील अनुकूल पाहिजेत. पाटील बिथरले की, तो व गुंड अस्पृश्यांना अगदी भंडावून सोडतात. त्यांच्यावर कडकडीत सामाजिक बहिष्कार घालतात तसा तो त्यांना तेथे घालता येतो. अशा बहिष्काराला अर्थातच अस्पृश्य घाबरतात आणि साहजिकच ते प्रस्तुतच्या चळवळीपासून दूर राहू इच्छितात आणि राहतातही. अस्पृश्यांची स्थिती आजही विचित्र आहे.