केवळ शिक्षणाने योग्यता येते असे नाही १८३
या इंग्रजी राज्यात अस्पृश्यांवरील सामाजिक बहिष्कार दूर करणारा कायदा काही खास होत नाही. आपले आता स्पष्ट मत झाले आहे की आपण सर्वांनी स्वराज्यवादीच झाले पाहिजे. या देशात निदान महार, मांगांना स्वराज्य पाहिजे. सद्याच्या स्वराज्याच्या भानगडीत देणेही दुसऱ्याचे पदरात पडेल. आता स्वराज्याची घटना होत आहे. त्यात आम्हा गरजू लोकांना मात्र वाटा आला पाहिजे ; पण या स्वराज्याच्या वाटाघाटीत काही तथ्य आहे असे मला वाटत नाही. माझा इंग्रज सरकारवर विश्वास नाही मी स्पष्ट सांगतो. आमच्या उद्धारार्थ हे सरकार काही करणार नाही, आमचा उद्धार आम्हीच करून घेतला पाहिजे. स्वागताध्यक्ष म्हणतात की, अस्पृश्यता आहे तोपर्यंत स्वराज्य मिळत नाही. पण ही केवळ भूल आहे. इंग्रज सरकार काही तत्त्वज्ञानानुवर्ती नाही. ते पक्के व्यवहारी आहे. ते काही मागतील त्याला स्वराज्य द्यायला आलेले नाही. इंग्रज सरकार चावणाऱ्या, ओरबडणाऱ्याला खूष करणार, ते आपले साम्राज्य सुरक्षित आहे की नाही हे पाहाणार. त्याला तुमच्या भानगडीशी काहीच कर्तव्य नाही. या देशातील सुखाकरिता स्वराज्य कोणी देणार नाही. सांप्रत स्वराज्याच्या बाबतीत वाटाघाटी चाललेली आहे. त्यात तुम्हा आम्हाला विचारताहेत काय ? महात्मा गांधी, सप्रू, नेहरू, जिना यांच्याशी विचारविनिमय करीत आहेत. या लोकांचा आपल्याशी किती संबंध येत असेल ते दिसतेच आहे. यासाठी आता आपण स्वराज्यवादी झाले पाहिजे ; पण नुसते ते स्वराज्य मिळवून तरी काय होणार आहे ? स्वराज्याची आपणास लायकी पाहिजे. आपण आरडा ओरड केली तर आपणाला पाहिजे ती सत्ता मिळेल ; पण ज्ञानाशिवाय ती व्यर्थ आहे. अस्पृश्यांच्या नुसत्या बहुसंख्येप्रमाणे काही होणे नाही. स्वराज्याच्या उपभोगार्थ लायकीच पाहिजे. आपली सामाजिक स्थिती इतर समाजाच्याहून अगदी भिन्न आहे. आपला हा जातिभेद इतर समाजातही आहेच ; पण आपल्यात एक अगदी विशेष नमूनादाखल असा दुसरा गुणभेद आहे.
जातीभेद व गुणभेद समांतरगामी आहेत. ते आजही पॅरलल आहेत. असा प्रकार इतर कोणत्याही देशात आढळणार नाही. आम्ही अनादी काळापासून आनुवंशिक गुण मान्य केले, त्याचे दुष्परिणाम भोगतो आहो. कितीही विद्वान अस्पृश्य दूरच राहतो. पण अडाणी ब्राह्मण वरच्या जागी वावरतो. हे आजवर केवळ अज्ञानानेच चालू देण्यात आले. अज्ञान नसते तर समतेचा लढा केव्हाच सुरू झाला असता. ब्राह्मण गुणाने कनिष्ठ असला तरी जन्माने श्रेष्ठ असतो.