८-८-१९३० एकसंध भारत आमचे ध्येय आहे - Page 236

१९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मूल्य मी ओळखतो. तथापि, त्याद्वारे तुम्ही माझ्यावरे टाकलेली जबाबदारी अतिशय कठीण व असामान्य स्वरुपाची असून ती मी टाळण्याचा प्रयत्न केला असता तर शहाणपणाचे ठरले असते, असे मला वाटते. असे असूनही त्याला मी संमती दिली याचे कारण म्हणजे सध्याच्या आणीबाणीच्या प्रसंगी आपल्या समाजबांधवांच्या हितासाठी प्रत्येकाने आपल्या शक्तीनुसार आपली सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे, असे मला सतत वाटते. तथापि, ही जबाबदारी पार पाडण्यास तुम्ही तुमच्या सहकार्यात व मदतीत कसलीही कसूर ठेवणार नाही व येथे गोळा झालेले आपल्या समाजाचे पुढारी आपल्या समृद्ध अनुभवाचा व विचारशील निर्णयाचा लाभ मला देणार आहेत, याची मला जाणीव असल्यामुळेच मी ती स्वीकारली आहे.

१. भारतातील स्वराज्याचा प्रश्‍न

२. भारतातील लोकांचा स्वयंशासित अशाप्रकारचा एकसंध समाज होऊ शकेल काय? हा प्रश्‍न आज भारताच्या क्षितिजावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात डोकावताना दिसत आहे. या प्रश्‍नाच्या संदर्भात दलित वर्गाचे मत काय आहे, याचा निर्णय घेण्यासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत. या प्रश्नाने केवळ भारतीय लोकांच्याच नव्हे तर संपूर्ण ब्रिटिश राज्यात आणि संपूर्ण जगात हलचल माजून राहिली आहे. या प्रश्‍नाच्या आपल्या उत्तरावरच या देशाचे भवितव्य बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. आपण त्याला दुजोरा देऊन चालना देऊ शकतो किंवा त्याला विरोध करून त्यात खोळंबाही निर्माण करू शकतो. एकंदरीत ते आपल्याच मतावर अवलंबून आहे. म्हणून हा प्रश्न तुम्हाला ढिलाईने हाताळता येणार नाही, असे माझे मत आहे. तुम्ही त्याच्या उलट सुलट बाजूंचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. आपला निर्णय इतरांपेक्षा वेगळा झाला तर कसे होईल अशी भीती आपण बाळगू नये. परंतु आपला निर्णय स्वतंत्र विचाराने व विशुद्ध श्रद्धेने घेतल्या गेला पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे.

३. या प्रश्‍नाला दोन बाजू आहेत, याची तुम्हाला जाणीव आहेच. भारतातील जनता विभिन्न मानव वंशाची मिळून बनलेली असल्याचे सांगण्यात येते. कारण येथील लोक परस्परविरोधी अशा रूढी, प्रथा व तत्त्वे असणाऱ्या भिन्न धर्माचे उपासक आहेत. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात आणि परस्परविरोधी सामाजिक रूढींमुळे व विभिन्न हितसंबंधांमुळे येथील जनतेत परस्पराबद्दल बेताल द्वेष भरलेला आहे. असे त्यांचे म्हणणे आहे. असा प्रश्‍न विचारण्यात येतो की, अशातऱ्हेचा भिन्रवंशीय लोकांचा समूह स्वयंशासित समाज म्हणून कसा यशस्वी होऊ शकेल? ही कठोर वस्तुस्थिती असून भारतातील स्वराज्यावर त्याचे काय