एकसंध भारत आमचे ध्येय आहे १९५
परिणाम होऊ शकतील, हे कोणीही शहाणा माणूस नजरेआड करू शकत नाही. परंतु ही कठोर सत्ये मान्य केली तरी त्यापासून निर्माण होणारे निष्कर्ष कोणते ? सभ्य गृहस्थहो, या प्रश्नावरील तुमची मते मांडण्यास तुम्ही सुरू करण्यापूर्वी दुसन्याही काही तितक्याच कठोर सत्यांकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. लॅटिव्हिया, रुमानिया, लिथिआनिया, युगोस्लाव्हिया, इस्टोनिया आणि झेकोस्लोव्हाकिया यासारख्या देशात असलेल्या स्थितीचाही विचार करा. ही नवीन राज्ये असून 'स्वयंशासन' तत्त्वाच्या स्थापनेसाठी शपथपूर्वक लढण्यात आलेल्या १९१४ च्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अस्तित्वात आली आहेत. ही नवीनच अस्तित्वात आलेली राष्ट्रे स्वयंशासित, सार्वभौम, स्वतंत्र आणि अंतर्गत किवा बाह्य निर्णयाबाबत सर्वश्रेष्ठ अधिकारी अशी आहेत. या राष्ट्रातील अंतर्गत सामाजिक परिस्थिती कशी आहे? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भारतापेक्षा अधिक नसली तरी भारताइतकीच तेथेही वाईट स्थिती आहे. लॅटिव्हियात लेट लोक, रशियन, ज्यू आणि जर्मन व याशिवाय इतर लोकही आहेत. लिथिआनियात लिथोनिअन, ज्यू पोल आणि रशियन हे अन्य इतर लोकांसमवेत आहेत. युगोस्लाव्हियात सर्ब, क्रोट, स्लाव्हन रुमानियन, हंगेरियन, अल्बेनियन, जर्मन व शिवाय इतर स्लाव लोक आहेतच. इस्टोनियात इस्टोनियन, रशियन, जर्मन व इतर लहान गटाचे लोक आहेत. झेकोस्लोव्हाकियात झेक, जर्मन, मेग्यर, रुथिनिअयन आणि इतर लोक आहेत. हंगेरीत मेग्यर, जर्मन आणि स्लोव्हाक लोक आहेत. वंशांनी व भाषांनी भिन्न-भिन्न असूनही अत्यंत लढाऊ अशी आपली राष्ट्रे त्यांनी तयार केली. एकसंध राष्ट्राच्या निर्मितीसाठी या भिन्न वंशांच्या लोकांना जोडण्यासाठी धार्मिक ऐक्याचाही दुवा नाही. त्यांच्यामध्ये चार किंवा पाच प्रकारचे कॅंथालिक पंथाचे लोक तुम्हाला आढळतील. तेथे रोमन कॅथॉलिक, ग्रीक कॅथॉलिक, झेकोस्लोव्हाक कॅथॉलिक पंथांचे लोक आहेत. या कॅथॉलिकांशिवाय एव्हॅजकीलन, ज्यू, प्रॉटेस्टंट लोक व इतर लहान लहान पंथाचे अनेक लोक आहेत. यावर गंभीरतापूर्वक विचार करा. या देशात आढळणाऱ्या मानवी जगतापेक्षा भारतातील मानवी जगत अधिक भिन्न वंशीय व अधिक बजबजपुरी असलेले आहे काय ? मला खात्री आहे की ते तसे नाही. जर तुमचा भारतासंबंधीचा निर्णय प्रामाणिक व स्वतंत्र व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर ही वस्तुस्थिती तुम्ही विचारात घेतली पाहिजे. सज्जनहो, या तुलनेचा परिणाम म्हणून असा प्रश्न उद्भवतो की, जर लॅटिव्हिया, लिथिओनिया, युगोस्लाव्हिया, इस्टोनिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी आणि रुमानिया हे देश, वंश, भाषा, धर्म आणि संस्कृती यामध्ये विभिन्नत्व असूनही एकसंघ व स्वयंशासित राष्ट्रे म्हणून निर्वाह करू शकतात तर भारतही तसा निर्वाह का करू शकणार नाही? याला काही उत्तर आहे काय? माझ्याजवळ तर कोणतेही उत्तर नाही आणि आपल्या मित्रांपैकी जे कोणी याचे उत्तर देऊ शकतील ते ऐकण्यासाठी मी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात आहे. |