१९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
४. स्वराज्याची सुविधा प्राप्त होण्यापूर्वीच एखाद्या राष्ट्रातील सर्व परस्पर विरोधी घटक नष्ट होऊन ते पूर्णत: एकसंध राष्ट्र व्हावे असा दुराग्रह धरणे माझ्या मते वस्तुस्थितीचा उलटा क्रम लावण्यासारखे असून, स्वयंशासनाच्या प्रक्रियेत एकराष्ट्रीयत्व निर्माण करण्याची जी शक्ती आहे तिच्याकडे दुर्लक्ष करणेच होय. एक भाषा, एक धर्म व एक संस्कृतीच्या सूत्रबंधनाने बांधलेली राष्ट्रे या जगात फारच कमी आहेत. परंतु धर्म, भाषा व संस्कृती यांनी भिन्न असलेल्या लोकसमूहांनी राजकीय, भौगोलिक व ऐतिहासिक समानतेमुळे एकत्र येऊन परिणामतः एकराष्ट्रीय जनता झाल्याची उदाहरणेच अनेक आहेत. अशा राष्ट्रांना एकराष्ट्रीयत्वाची कठोर कसोटी जर लावली असती, तर त्यांना स्वयंशासनाचा हक्क कधीही प्राप्त होऊ शकला नसता. यासंबंधी जे काही सांगण्यात आले व जे करण्यात आले ते जमेस धरले तरी अनेक राष्ट्रांना संघटित होण्यासाठी स्वयंशासन हेच एक महत्त्वाचे कारण ठरले नाही काय? आणिती राष्ट्रे स्वयंशासनाच्या अभावी पूर्वी होती तशीच विभिन्न लोकांच्या समूहाच्या स्वरुपात स्पष्टपणे होती तशीच राहिली नसती काय? जर्मन साम्राज्याने स्वयंशासनाचा नियम स्वीकारणे, हेच त्याच्या एकराष्ट्रीय होण्याला कारणीभूत ठरले नाही काय? बब्हेरिअन, प्रुशिअन, सँक्सन आणि इतर अनेक विभिन्न जनसमूह एका राष्ट्रात अंतर्भूत होऊन एका सामान्य शासनाखाली आले नसते तर १८७० सालापूर्वी होते तसेच राहिले नसते काय? विभिन्न वंशाच्या जनसमूहांना एका राष्ट्रात अंतर्भूत करण्यासाठी 'एक शासन ' बरेचदा एक उत्तम उपाय ठरू शकतो. भारताच्या स्वतःच्या उदाहरणावरूनही हे सिद्ध होत नाही काय? आज भारतामध्ये जी काही किंचित एकराष्ट्रीयत्वाची व एकत्वाची भावना दिसून येते ती ब्रिटिश राज्यामध्ये एका सर्वसामान्य शासनामुळेच उद्भवली ही सर्वमान्य बाब नाही काय? ऐतिहासिक किंवा तकदृष्टीने पाहिले तरी भारतातील जनतेची विभिन्नता ही भारताच्या स्वयंशासनाच्या मार्गात आड येऊ शकत नाही, असे मला वाटते; आणि भारत हे एकराष्ट्र व्हावे असे जर ध्येय असेल तर या ध्येयाच्या पूर्ततेसाठी स्वराज्य सर्वात महत्त्वाचे साधन ठरेल, असे मी म्हणेन.
२. या समस्येतील अटी
५. भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या जनसमूहाच्या या विभिन्रत्वाचा काहीच परिणाम होणार नाही काय? स्वराज्याची घटना तयार करताना आपण त्याचा काहीच विचार करावयास नको काय ? हे प्रश्न तुम्ही मला विचाराल, याबद्दल मला मुळीच शंका नाही. परंतु का कू न करता याचे मी स्पष्ट उत्तर देतो की,