८-८-१९३० एकसंध भारत आमचे ध्येय आहे - Page 240

१९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

प्रतिस्पर्ध्याला साहाय्यभूत होतील. सामाजिक स्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे धनसंपन्न, उच्चशिक्षित व उच्चवर्णाच्या लोकांची शासन सत्तेत सरंजामशाही स्थापन होणार असेल तर, आपल्या ध्येयाशी सुसंगत अशा सर्व उपायांनी त्याला आळा घालणे हे आपले कर्तव्य आहे, असे मला वाटते. कारण, केवळ आपल्या धन्याचा बदल होण्यावर आपण मुळीच समाधान मानता कामा नये. कोणत्याही देशाचे दुसऱ्या देशावर राज्य असणे चांगले नाही, हे काँग्रेसवाल्यांचे मत मला मान्य आहे. परंतु मलाही त्यांना हे स्पष्टपणे सांगण्याचे स्वातंत्र्य आहे की, त्यांचे वरील विधान तेथेच संपत नसून ' कोणत्याही वर्गाचे दुसऱ्या वर्गावर राज्य असणे ही चांगली गोष्ट नाही ' हेही तितकेच खरे आहे. युरोपियन नोकरशाही व स्वदेशीयांची सरंजामशाही हा शब्द संपत्ती, शिक्षण व सामाजिक दर्जा यासाठी मी समुच्चयाने वापरीत आहे, या दोहोंपैकी जनतेची कोण अधिक उत्तम काळजी घेऊ शकेल? सरंजामदारांचे असे म्हणणे आहे की, जनतेची परिस्थिती, त्यांच्या सवयी, त्यांच्या विचार करण्याच्या व जीवन जगण्याच्या पद्धती, गरजा व तक्रारी, आणि तडजोड करण्याच्या त्यांच्या रीतींची माहिती यांचे ज्ञान त्यांना ब्रिटिश नोकरशाहीपेक्षा कितीतरी अधिक आहे. तसे कदाचित असेलही, परंतु सरंजामदार वर्गाच्या मनात इतर वर्गासंबंधी पक्षपाताची भावना आहे; उघड दिसणारा वंशाभिमान आहे, आपल्या जातभाईची कड घेण्याची वृत्ती आहे आणि त्यामुळे सामान्य जनतेचे भवितव्य ठरविणारी शासनसत्ता त्यांच्या हाती दिल्या जाऊ नये. असा जो आरोप त्यांच्यावर आहे, त्यातून ते सुटू शकत नाहीत, असे मला वाटते. वास्तविक पाहता, कोणी याही पुढे जाऊन म्हणू शकेल की, त्यांना व सामान्य जनतेला विभाजित करणाऱ्या फार मोठ्या सामाजिक दरीमुळे त्यांना सामान्य जनतेच्या गरजा, आशाआकांक्षा यांचे ज्ञान असूच शकत नाही. इतकेच नव्हे तर हा वर्ग सामान्य जनतेच्या आकांक्षाचा फार मोठा शत्रू आहे. मी एवढा भर देऊन सांगत आहे याचे कारण म्हणजे या सरंजामदार वर्गाच्या हाती शासनसत्ता सोपविल्या जाऊ शकत नाही; कारण हजारो वर्षापासून चालत आलेल्या व आजही लागू असलेल्या लोकशाहीच्या सामान्य जनतेच्या कल्पनेशी ही कोऱ्या स्वराज्याची कल्पना विरोधी आहे. आधुनिक लोकशाही राज्यातील मूलभूत तत्त्व म्हणजे, प्रत्येक व्यक्तीचे मूल्य मान्य करणे हेच होय आणि प्रत्येक व्यक्तीला केवळ एकदाच हे जीवन जगण्याची संधी मिळत असल्यामुळे त्याला त्याच्या सुप्त गुणांची वाढ. करण्यास पुरेपूर संधी मिळाली पाहिजे. परंतु भारतातील सरंजामदारांना या तत्त्वांपैकी कोणतेही तत्त्व मान्य आहे, असे म्हणता येणार नाही. त्यांचे काहीसे असे मत आहे की, सध्याचे जीवन हे अनेक जीवनांच्या शृंखलेपैकी एक असून या जीवनातील त्यांची स्थिती ही गत जन्मातील