२०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
त्या प्रमाणात कायदेमंडळामध्ये प्रतिनिधीत्व देण्याचे ठरवून देणे म्हणजे प्रत्यक्ष समाजामध्ये आज जी स्थिती आहे तिचीच कायदेमंडळाच्या रूपाने लहान प्रतिकृती उभारणे होय व अशाप्रकारे बाहेरच्या समाजामध्ये बहुसंख्य व अल्पसंख्य जमातीचे जे बलाबल आहे ते तसेच संसदेमध्येही कायम ठेवणे होय. अशा प्रकारची योजना समाजातील बलाबल शाबूत ठेवते. ती सामाजिक स्थिती जशीच्या तशी कायम राखते. म्हणून अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जर खऱ्या स्वरूपात सुधारणा करावयाची असेल तर, अल्पसंख्यांकांना सोईचा होईल असा बदल सामाजिक शक्तींच्या समतोलामध्ये केला पाहिजे आणि लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा अतिरिक्त अशा पासंगाच्या जागा अल्पसंख्यांकांना देऊनच हे साध्य होऊ शकते.
११. सर्व अल्पसंख्यांकांना पासंगाच्या अतिरिक्त जागा प्रतिनिधीत्वात देणे आवश्यक आहे, हे मान्य झालेले असले तरी, त्याची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याबद्दल एकमत झाल्याचे दिसत नाही. या पासंगामुळे काय साध्य होऊ शकते, याची नीट कल्पना नसल्यामुळेच हे असे घडून येत आहे, असे मला वाटते. वर मी जे सांगितले आहे त्यावरून ही पासंगाच्या अतिरिक्त जागांची योजना अल्पसंख्यांकांचे हात बळकट करण्यासाठी करण्यात आली आहे, हे तुम्हास स्पष्टपणे दिसून येईल. नाहीतर या अतिरिक्त जागांशिवाय अल्पसंख्यांकांची शक्ती त्यांच्या संरक्षणासाठी अत्यंत तोकडी पडेल. म्हणून शक्तीचा जो पुरवठा करावयाचा आहे तो सध्याच्या स्थितीत किती प्रमाणात कमी आहे, याचे नापजोख घेऊन वाढविला पाहिजे. ज्यांच्या हातातील शक्ती कमी असेल त्यांना तिचा पुरवठा अधिक प्रमाणात झाला पाहिजे. कोणाच्या हातात वाजवीपेक्षा जास्त शक्ती असेल तर ती काढून घेतली पाहिजे. दुसऱ्या शब्दात हेच सांगायचे
म्हणजे सर्वच अल्पसंख्य जमातींना सारख्या प्रमाणात या अतिरिक्त पासंगाच्या जागा मिळणार नाहीत, तर त्यांच्या सामाजिक दर्जानुसार त्यांचे प्रमाण बदलते राहील. एखाद्या अल्पसंख्य जमातीचा सामाजिक दर्जा नीच असला तरी तिला जास्त जागा मिळतील आणि तिचा दर्जा प्रतिष्ठेचा असेल तर तिला कमी जागा मिळतील. दुर्दैवाने काही अल्पसंख्यांकांची वृत्ती केवळ स्वतःला इतरांपेक्षा उच्च बैठकीवर स्थानापन्न करण्याचीच नाही, तर जास्त प्रमाणात प्रतिनिधीत्वाच्या जागा हडप करण्याची आहे आणि तीसुद्धा त्यांचा सामाजिक दर्जा उच्च आहे म्हणून! मी आधिच सांगितले आहे की, पासंगाच्या अतिरिक्त जागा देण्यामागील हेतू केवळ एवढाच आहे की, वादळामध्ये कुडकुडणाऱ्या कोकराला थंडीपासून संरक्षण मिळावे आणि म्हणून आपण वर उल्लेखिलेल्या विपर्यस्त वृत्तीला विरोध केला पाहिजे कारण त्यामुळे देशहिताला व अन्य अल्पसंख्यांकांच्या हितालाही धोका पोहोचल्याशिवाय राहू शकत नाही.