८-८-१९३० एकसंध भारत आमचे ध्येय आहे - Page 256

२१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ठरण्याचा संभव आहे, असे मला वाटते. ज्या देशातील लोक एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेने, एका घटनेने व समान भवितव्याने बांधलेले असतील ते स्वराज्याचा धोका पत्करू शकतील. अशा स्थितीपासून हा देश शकडो मैल दूर आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. साम्राज्यांतर्गत स्वयंशासनाचे ध्येयच चांगले आहे, असे मला वाटते कारण पूर्ण स्वराज्याचे धोके टाळून आपणाला स्वयंशासित राष्ट्राचे फायदे त्यामुळे प्राप्त होतात. म्हणून आपण पूर्ण स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाला पाठिंबा नाकारला पाहिजे. कारण अजून त्याबद्दल काँग्रेसवाल्या लोकांच्या मनातही गंभीर शंका आहे | |

२४. परंतु साम्राज्यांतर्गत स्वयंशासनासंबंधी आपले मत काय राहील? कारण ते सुद्धा एकप्रकारचे स्वराज्य-म्हणजे जनतेचे, जनतेसाठी व जनतेने चालविलेले सरकार-असते. या प्रश्‍नावर निर्णय घेताना तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. इंग्रजांचे या देशातील आगमन हे त्याला एक मोठे वरदान ठरले, याबद्दल शंका असू शकत नाही. या सुदैवी साहाय्यावाचून भारतातील बौद्धिक जागृती व प्रगती इतकी जलद व इतकी मोठी झाली असती की नाही याबद्दल मला शंकाच वाटते. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या मूलभूत तत्त्वांनी युक्त असलेल्या युरोपीय संस्कृतीच्या साहचर्यावाचून हिंदू धर्मातील अनेक सामाजिक वाईट चालीरितीबद्दल त्यांना कधीही शरम वाटली नसती. कारण तो त्यांच्या धर्माचा व नीतीशास्त्राचा एक भाग होता. या दोन संस्कृतीच्या एकत्र येण्यामुळे त्यांच्यातील जोरदार विरोध भारतीयांना जाणवला व या सामाजिक दुष्ट रूढी व सामाजिक प्रथा दूर करण्याची गरज त्यांना भासू लागली. दुसऱ्या कोणत्याही उपायाने जे पुनर्सघटन होऊ शकले नसते ते या संधीमुळे भारतास करावे लागत आहे. ब्रिटिशांच्या आगमनावाचून एकच एक शासन पद्धतीची व एकच कायदा सर्वांना सारखा असण्याची फार मोठी सुविधा भारताला कधीच प्राप्त होऊ शकली नसती. कोणत्याही देशाच्या कल्याणासाठी ही काही लहान सहान शक्ती असलेली साधने नव्हेत तर भारतासाठी त्यांचे मूल्य अमर्याद आहे. राष्ट्रीयत्वाची भावना जितकी खोल रुजवावयाची असेल तितकी रुजविणे सोपे जाईल, अशी ही भूमी त्यामुळे तयार झालेली असून स्थिर राज्याचा पायाही. त्यांनी तयार करून ठेवला आहे. त्यांनी चलन, रस्ते, कालवे, रेल्वे, पोष्ट, इत्यादि बाबतीत सुधारणा न करता देशाला आधुनिक संस्कृतीच्या साधनांपासून दूर ठेवले, असेही म्हणता येण्यासारखे नाही.

२५. हे सर्व खरे आहे. परंतु प्रश्‍न असा आहे की, हे कशाच्या बदलीमध्ये? ब्रिटिश शासनाखाली भारतीय जनता एकप्रकारे खुजी होत असून तिची वाढ