२२२ डॉ. वाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
३०. या कायदेभंगाच्या चळवळीला मी पाठिंबा देऊ शकत नाही, याचे दुसरे कारण असे, आमच्या हितसंबंधाच्या, संरक्षणाच्या व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाशी ती सुसंगत नाही, असे माझे मत आहे. कायदेभंगाची चळवळ ही. जनतेची चळवळ आहे. ही अशी चळवळ आहे की, जबरदस्ती हे तिचे मुख्य तत्त्व आहे. ही पळापळीची पद्धती असून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जर ती सुरू केली तर क्रांतीमध्ये तिचे रुपांतर झाल्यावाचून राहणार नाही. एखादी क्रांती-मग ती रक्तरंजित असो की रक्तहीन असो- त्यात काही फरक पड़त नाही. यशाच्या दृष्टीने अत्यंत अनिश्चित असून या पद्धतीत गोंधळ माजण्याची व भयानक प्रसँग ओढविण्याची फार मोठी शक्यता असते. आपणासमोर फ्रेंच क्रांतीचे उदाहरण आहेच. तिचा दिखाऊ हेतू लोकशाही स्थापन करण्याचा होता परंतु सरतेशेवटी मात्र तिचा परिणाम अनिर्बंध हुकूमशाही निर्माण करण्यात झाला. पुष्कळदा क्रांती अनिवार्यही असते. ज्याप्रमाणे, विजयामुळे एका राष्ट्राकडून किंवा एका वंशाकडून दुसऱ्याच्या हातात सत्ता जाते त्याप्रमाणेच, क्रांतीमुळेही एका पक्षाच्या हातातून सत्ता दुसऱ्या पक्षाच्या हातात जाते. अशाप्रकारचा पोकळ बदल होण्यावर आमचे समाधान होणे शक्य नाही, याची मला खात्री आहे. भारतीय समाजामध्ये ज्या शक्ती सध्या कार्यरत आहेत त्यामध्ये राजकीय सत्तेच्या वाटपाद्वारा खराखुरा सापेक्ष बदल घडून येईल, अशाप्रकारचे सत्तांतर आम्हाला हवे आहे. यासाठी तडजोडीची आवश्यकता आहे. अशाप्रकारची तडजोड होण्यावर व तिची प्रत्यक्षात कार्यवाही होण्यावरच दलित वर्गाचे भवितव्य पूर्णतः अवलंबून आहे. भारतातील खरी समस्या केवळ सरकार स्थापन करण्याची किवा स्वातंत्र्य मिळविण्याची नसून ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र शासनसत्ता स्थापन करण्याची आहे आणि बकच्या भाषेत पुन्हा सांगायचे म्हणजे, “ खरे सरकार घडविण्यासाठी फार मोठी शहाणपणाची दृष्टी लागते. शासन सत्तेतील जागा निश्चित ठरवा, लोकांना आज्ञाधारकपणाची शिकवण द्या म्हणजे तुमचे कार्य तडीस गेले असे समजा. केवळ स्वातंत्र्य देणे हे फारच सोपे काम आहे. त्याला मार्गदर्शन करण्याची काहीच आवश्यकता नाही. केवळ शासनसत्ता सोडून देण्याचीच त्यास गरज असते. परंतु खरेखुरे स्वतंत्र सरकार घडविणे, म्हणजे स्वातंत्र्याला उत्सुक सर्व विरोधी शक्तींची समजूत घालून एकत्र आणणे व एकराष्ट्रीयत्वाच्या धाग्यात त्यांना बांधणे हे कठीण कार्य असून त्याला बराच विचार व गंभीर चितनाची आवश्यकता असते. आणि हा प्रश्न योग्य तडजोडीचा असून कायदेभंगाच्या धावपळीच्या पद्धतीने तो साध्य होणे संभवनीय नाही, याबद्दल मला पक्की खात्री आहे.