८-८-१९३० एकसंध भारत आमचे ध्येय आहे - Page 265

एकसंध भारत आमचे ध्येय आहे २२३

३१. सरद्गृहस्थांनो ! या कायदेभंगाच्या चळवळीला दलित वर्गाने पाठिंबा देऊ नये, असे मला का वाटते याची ही कारणे आहेत. वर्तुळ परिषदेद्वारा उपलब्ध झालेल्या शांततापूर्ण पद्धतीनेच त्यांचे कार्य अधिक सुकर होईल. म्हणून या वर्तुळ परिषदेसाठी तुमच्या अत्यंत विश्वासातील व उच्च पात्रतेची तुमच्यातील पुरेशी माणसे घेण्यात यावी, असा तुम्ही आग्रह धरला पाहिजे.

७. दलित वर्गाचे संघटन

३२. या आपल्या तटस्थतेच्या धोरणामुळे दलित वर्गाचे फार मोठे नुकसान होईल, असे माझ्या अनेक मित्रांनी सुचविले आहे. दलित वर्गाने ब्रिटिश सरकार व इंडियन नॅशनल काँग्रेस या दोहोंपैकी कोणातरी एकाशी मैत्री जोडावी, असे त्यांचे मत आहे. मी या प्रश्‍नावर पुन्हा पुन्हा विचार करून पाहिला, तेव्हा माझी खात्री पटली की या दोघांपासूनही वेगळे राहण्यातच दलित वर्गाची सुरक्षितता आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे साम्राज्यांतर्गत स्वराज्याला मी विरोध करू शकत नाही, कारण इंग्रज सरकार आपली समस्या सोडविण्यास कधीच समर्थ ठरू शकत नाही, असा माझा विश्वास आहे. परंतु काँग्रेसमध्ये सामील झाल्यामुळे आपला प्रश्‍न सुटण्याच्या दृष्टीने आपली प्रगती झाली, असे कसे म्हणता येईल, तेच मला कळत नाही. आता काँग्रेस अस्पृश्यता पाळण्यास मान्यता देत नाही आणि सर्व जनतेची प्रतिनिधी म्हणून तीच केवळ संस्था आहे, असे सांगण्यात

येते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अस्पृश्यतेच्या प्रथेची निदा करणारा ठराव पास केला आहे, यात शंका नाही. परंतु त्याला वास्तवात उतरविण्यासाठी काँग्रेसने काही केले आहे काय ? आपल्या धोरणाचा प्रसार करण्यासाठी कॉंग्रेसने आपल्या सभासदांवर खादी वापरण्याची अट घातली आहे. परंतु अस्पृश्यता न पाळण्याची अट काँग्रेसने आपल्या सभासदांवर का घातली नाही ? अशाप्रकारचे बंधन सहजगत्या व्यवहारात उतरविता आले असते. स्पृश्य सभासदाला आपल्या घरी एखादा अस्पृश्य नोकर ठेवून किंवा एखादा विद्यार्थी शिकण्यासाठी ठेवून या अटीचे सहज पालन करता आले असते. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणासाठी जे काही प्रयत्न केले त्याचा काही परिणाम घडून आला आहे काय ? त्यांचा नैतिक पाठिंबा कितीही मोठा असला तरी त्यांचा व्यक्तिगत प्रभाव व त्यांची वैशिष्ट्यपूर्ण साधने लक्षात घेता त्यांनी आपला हेतू प्रत्यक्षात उतरविण्यासाठी फारच अल्प प्रयत्न केलेला आहे. सूत-कताईसाठी दरवर्षी फंड गोळा करण्यासाठी ते फेरी मारतात. अस्पृश्यतेविरूद्ध त्यांनी कधीतरी अशी एखादी मोहीम उघडली काय ? त्यांनी चरख्यावर जेवढा आपला वेळ खर्च केला त्याच्या एकशतांश भागही या कार्यासाठी खर्च केला नाही. हिंदू आणि मुसलमानांमध्ये ऐक्य प्रस्थापित व्हावे म्हणून ते तीन आठवड्यांच्या उपोषणाला कसे बसले होते,