८-८-१९३० एकसंध भारत आमचे ध्येय आहे - Page 269

एकसंध भारत आमचे ध्येय आहे २२७

त्यांच्या जीवन निर्वाहाचे जे वाईट मार्ग आहेत ते त्यांनी सोडले पाहिजेत. जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल केल्यामुळे तुमची राहणी इतकी उत्कृष्ट झाली पाहिजे की इतरांना तुमच्याबद्दल आदर, तुमची मैत्री हवीहवीशी वाटली पाहिजे. तुम्ही सुशिक्षित झाले पाहिजे. केवळ लिहिण्यावाचण्याचे ज्ञान पुरेसे ठरणार नाही; तर आपणापैकी काही शिक्षणाच्या उच्च टोकापर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणजे त्यांच्याबरोबर वाटचाल करून संपूर्ण समाजाचा दर्जा उंचावेल. ' ठेविले अनंते तैसेचि राहावे ' या उदासिन वृत्तीचा त्याग करण्यास लोकांना प्रवृत्त केले पाहिजे. कारण आहे त्या स्थितीत समाधानी न होण्याच्या वृत्तीतूनच समाजाची उन्नती होत असते आणि शेवटची परंतु कमी महत्त्वाची नसलेली बाब म्हणजे दलित वर्गात स्फूर्ती व उत्साह निर्माण केला पाहिजे म्हणजे त्यांच्या मनातील भीती नष्ट होऊन इतरांच्या बरोबरीने आपल्या मानवी हक्काच्या वहिवाटीस ते सुरवात करतील. आपल्या हातात केवळ राजकीय सत्ता येण्याने हे परिणाम घडून येणार नाहीत. उद्दिष्ट साध्य करण्याचे ते फक्त एक साधन आहे, हे आपण ओळखले पाहिजे. मी ही धोक्याची सूचना देण्याचे कारण म्हणजे केवळ दलित वर्गातील काही लोकांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळाल्याने दलित वर्गाच्या यातना नष्ट होतील, असा काही लोकांचा गैरसमज झालेला आहे. हे सर्व कार्य सामाजिक उन्नतीचे आहे. कै. गोखल्यांच्या ' सर्व्हंटस्‌ ऑफ इंडिया ' किंवा के. लाला लजपतराय यांच्या ' सर्व्हंटस्‌ ऑफ पीपल ' या संस्थेच्या धर्तीवर दलित वर्गाची एक संस्था स्थापून तिच्यावर ही जबाबदारी सोपविली पाहिजे.

समारोप

३६. सद्गृहस्थांनो | वाजवीपेक्षा जास्त लांब भाषणाने मी तुम्हास त्रस्त केले, याबद्दल मला खेद वाटतो. परंतु संक्षिप्ता नेहमीच अपेक्षित असली तरी राजकारणाबद्दल परिचित नसलेले लोक जेथे प्रथमच एकत्र झालेले आहेत, अशासारख्या आजच्या सभेत आपल्या प्रश्‍नांच्या सर्व बाजूंचा विचार करणे मला योग्य वाटले. तुम्हाला शक्य तितके अधिक मार्गदर्शन करावे, असा माझा हेतू होता त्यामुळे लांब भाषणाबद्दल मी क्षमेला पात्र आहे, असे वाटते. ही आपली सभा शेवटची ठरणार नाही, तर आपल्या भव्य चळवळीची ती केवळ सुरवात ठरावी आणि तिच्याद्वारा आपल्या लोकांना मुक्ती मिळून या देशात प्रत्येक व्यक्ती हे एक मूल्य--राजकीय, सामाजिक व आर्थिक मूल्य-मानण्यात येईल, अशी समाजरचना निर्माण करण्यास ती कारणीभूत ठरेल, अशी मी आशा व्यक्त करतो.

आपण मला जो बहुमान दिला आणि माझे भाषण ऐकून घेतले याबद्दल मी आपणा सर्वाचा आभारी आहे.' १

eee

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : संपा. मा. फ गाजरे, खंड-२, पृ. ६५-९८.