देशाच्या स्वराज्यास माझा पाठिवा असेल २२९
ह्या सिद्धांतरूप गोष्टीने निर्भयपणे व निरपेक्षबुद्धीने समर्थन करण्याचे मनोधैर्य आपल्याठायी अलौकिक असल्याचा आम्हास चांगला अनुभव आहे. तरी आपण ज्या कामगिरीवर जात आहा तीत आपल्या ह्या प्रशंसनीय गुणांचे योग्य दिग्दर्शन होऊन आपण खरे देशभक्त व सत्यनिष्ठ असल्याबद्दलच्या आपल्या कीर्तीत भर पडेल असा आम्हास पूर्ण भरवसा आहे. लोभलाभास वश होऊन स्वदेशाच्या वारतविक चिरस्थायी कल्याणाच्या गोष्टींविषयी आपण कदापि उदासीन होणार नाहीत किवा त्यांचा पुरस्कार करण्यात आपण बिलकूल माघार घेणार नाहीत अशी आम्हास पूर्ण खात्री आहे. कारण आपली संस्कृती अत्युच्च दर्जाची असल्यामुळे असा प्रकार आपणाकडून सहसा होणार नाही. तरी आमच्या देशाची खरी वकिली करण्याचा सुयोग आपणास प्राप्त झाला आहे. त्याचा योग्य फायदा येण्यास आपण यत्किंचितही कसूर करणार नाहीत अशी आम्हास पूर्ण उमेद आहे.
सुजन महाशय, आमच्या देशातील एका मोठ्या जनवर्गाच्या बाबतीत धार्मिक व सामाजिक संबंधाने अतिघोर अन्याय कैक शतके चालू राहून त्यास हीनदीन स्थिती प्राप्त झाली आहे. तीतून त्याचा उद्धार झाल्यावाचून आमच्या देशास खरी उन्नती प्राप्त होणार नाही. या गोष्टीविषयी अलिकडे कित्येक मोठ्या मनाच्या माणसास थोडेसे वाटू लागले आहे. आणि ह्या जनवर्गाच्या उद्धारासाठी त्यांच्याकडून थोडीसी खटपट चालू आहे. परंतु आपण ती हाती घेतल्यापासून तिला विशेष महत्त्वाचे व विशेष परिणामकारक असे स्वरूप येऊ लागले आहे. आणि आणखी काही वर्षे आपण आपले प्रयत्न चालू ठेवले तर ह्या प्रकरणी बरेच यश प्राप्त होणार आहे. आपल्यासारख्या खऱ्या कळकळीचा व समर्थ वाली ह्या जनवर्गास कधीही प्राप्त झाला नव्हता. आपण चालविलेल्या उद्योगामुळे आपणास ह्या वर्गाकडून देवासारखा मान मिळू लागला आहे. आणि त्यांची आपणावर निःसीम भक्ती बसली आहे. ह्या मानाला व विश्वासाला आपण सर्वतोपरी पात्र आहा. कारण त्यांच्या हिताप्रित्यर्थ वाटेल तो आत्मयज्ञ करण्यास आपण सर्वदा तत्पर असता आणि आपली योग्यता अतिशय मोठी असल्याकारणाने
आपल्या वजनाचा, बुद्धिमत्तेचा व स्वहितपरतेचा परिणाम सर्व प्रकारच्या लोकांच्या मनावर उत्तम होत असतो. अशा योग्य व निश्चयी पुरूषाचा ह्या जनवर्गास राजकीय हक्क प्राप्त करून देण्याच्या कामी उत्तम उपयोग होणार आहे. आणि लंडन येथील परिषदेत ह्या जनवर्गाच्या राजकीय हक्कांचे योग्य समर्थन आपल्या हातून अवश्य होणार आहे. ह्या वर्गाची वकिली आपण उत्तमप्रकारे बजावून [तीत ] सुयश संपादाल अशी आम्हास उमेद आहे.
राजकीय बाबतीत आपल्या धोरणाची रूपरेषा नागपूर येथे थोड्या दिवसांपूर्वी भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत वर्ग परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून केलेल्या आपल्या भाषणात दाखविलीच आहे. ते धोरण एकंदर हिंदी राष्ट्र आणि अस्पृश्य मानलेले वर्ग यांच्या हिताचे आहे, याविषयी आमची खात्री आहे.