२-१०-१९३० देशाच्या स्वराज्यास माझा पाठिंबा असेल - Page 272

२३० डॉ, बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हीनदीन जनांचे कैवारी महाराज, आपण नुसती लंडनची यात्रा करूनच परत येणार नसून पूर्वोक्त जनवर्गाच्या उद्धारार्थ लागणारे द्रव्य सहाय्य मिळविण्याच्या उद्देशाने अमेरिका वगैरे देश फिरून तिकडील जगन्मित्रांच्या सहानुभूतीचा ओघ या अकिंचन जनवर्गाकडे वळविण्याचा प्रयत्न करणार आहा असे आम्ही ऐकतो. हा आपला उद्देश अत्यंत स्तुत्य होय. आपल्यासारख्या सुविद्य, थोर व स्वार्थरहित पुरूषाला अमेरिकेसारख्या धनसंपन्न देशात आपला सदुद्देश खात्रीने चांगला सिद्धिस जाईल व स्वकीय जनांचे थोडेबहुत उजितसाध्य केल्याचे आपणास सुयश प्राप्त होवो असे आम्ही मनापासून इच्छितो आणि “ जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा " ह्या साधुक्तीप्रमाणे आपण सर्वमान्य व सर्वपूज्य होऊन आपल्या जीविताचे साफल्य होईल.

शेवटी आम्ही असे मनःपूर्वक इच्छितो की, आपणास हा अत्यंत महत्त्वाचा प्रवास सुखाचा होवो व आपले आरोग्य कायम राहून आपण ज्या महत्त्वाच्या कामगिरीवर जात आहा ती यशस्वीरितीने पार पाडण्याचे सामर्थ्य आपल्या ठायी कायम राहो. आणि आपण सुकिर्ती संपादून स्वदेशी सुखरूप येण्याची आम्ही उत्कंठापूर्वक वाट पाहात राहू.

मानपत्र वाचून झाल्यानंतर ते व थैली अध्यक्ष डॉ. सोळंकी यांच्या हस्ते अर्पण केली. डॉ. बाबासाहेब यांनी त्या दोहोंचाही स्वीकार केला."

नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानपत्रास उत्तर देण्यासाठी उभे राहिले परंतु त्यांचा कंठ दाटून आल्याने सुमारे ५/६ मिनिटे त्यांना काहीच बोलता येईना. नंतर त्यांनी आपल्या भाषणास सुरूवात केली. ते म्हणाले,

अध्यक्ष महाराज व बंधु भगिनींनो,

आजच्या प्रसंगी मी आपणास काय सांगावे हे काही सुचत नाही ; कारण आता आपणा सर्वांची व माझी जवळ जवळ ५/६ महिने भेट होणार नाही या विचाराने माझे हृदय भरून येत आहे. गेल्या दोन वर्षात माझ्याकडून जी काही थोडीफार कामगिरी झाली असेल, त्याला हजारो सद्गृहस्थांनी मदत केली नसती, तर माझ्या एकट्याच्या हातून काहीच झाले नसते. मी केलेल्या कामगिरींच्या वाट्यापैकी मुंबई कायदे कौन्सिलमधील कामात माझे मित्र डॉ. सोळंकी यांनी जास्त सहाय्य केले आहे. १९२६ साली गव्हर्नरने मला बोलावून विचारले की, जर अस्पृश्य वर्गापिकी डॉ. सोळंकी यांना मुंबई कायदे कौन्सिलतर्फे निवडले तर त्यांचे व तुमचे कौन्सिलमध्ये जमेल किंवा नाही ? यावर मी उत्तर दिले की, सोळंकी हे चांगले